Mon, May 20, 2019 18:09होमपेज › Kolhapur › नागाव दुर्घटना : जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

नागाव दुर्घटना : जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर महामार्गावर नागाव (ता. हातकणंगले) फाट्याजवळील भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे शासकीय रुग्णालयातून मंगळवारी सांगण्यात आले. प्रकृती चिंताजनक बनलेल्या तन्मय वडगावकर व मस्तकीम इजाज मुजावर यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे.

किल्ले पन्हाळा येथून शिवज्योत घेऊन जाणार्‍या सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ट्रकला अपघात होऊन सहा भावी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. 28 जण गंभीर जखमी झाले होते. त्यात दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.

मस्तकीम मुजावर याला सोमवारी मध्यरात्री मिरजेतील मिशन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. तन्मय वडगावकर याच्यावर येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोन जखमी विद्यार्थी वगळता अन्य सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे, असे उपप्राचार्य राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

ट्रक चालकाला दोन दिवस पोलिस कोठडी

नागाव फाटा दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या सखाराम वामन धनवाड (वय 32,रा.बाबलदरा, मु.पो.जगलपूर,जि. लातूर) या ट्रकचालकास दुपारी पेठवडगाव (ता.हातकणंगले) येथील मुख्य न्यायदंडाधिकार्‍यासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.