Mon, Jun 24, 2019 16:52होमपेज › Kolhapur › इंजिनियरिंगचे सहा विद्यार्थी अपघातात ठार

इंजिनियरिंगचे सहा विद्यार्थी अपघातात ठार

Published On: Feb 20 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 12:59AMकोल्हापूर  ;  प्रतिनिधी

किल्ले पन्हाळा येथून शिवज्योत घेऊन जाणार्‍या सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ट्रकला अपघात होऊन सहा भावी अभियंते ठार, तर 28 जण जखमी झाले. पुणे-बंगळूर महामार्गावर नागाव फाटा येथे सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. शिवज्योतीमध्ये तेल टाकण्यासाठी थांबलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी : प्रणित शांताराम निरोलटकर (वय 19, रा. टाटा कॉलनी, चेम्बूर, मुंबई), सुशांत विजय पाटील (18, अंजनी, ता. तासगाव), केतन प्रदीप खोचे (21, तासगाव, जि. सांगली), अरुण अंबादास बोंडे (21, रामगाव, जि. बुलढाणा), सुमित संजय कुलकर्णी (19, विरळे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर), प्रतीक पोपट संकपाळ (23, डफळापूर, ता. जत). या अपघातातील मस्तकीम इजाज मुजावर (17, इस्लामपूर), तन्मय वडगावकर (19, आटपाडी, जि. सांगली) या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सीपीआरमधून सांगण्यात आले.

इतर जखमी असे ; राहुल शशिकांत सुतार (18, मिरज), सिद्धार्थ प्रवीण कांबळे (16, इस्लामपूर), साजिदअली महंमद (20, जत), गणेश महादेव पाटील (18, मिरज), प्रणव दिलीप मुळे (17, कवलापूर, ता. मिरज), नीलेश तुकाराम बुरगे (25, बार्शी, जि. सोलापूर), आदित्य नृसिंह कोळी (16, तारदाळ), सुभाष धोंडिराम सरगर (16, चोपडी), अविनाश शंकरराव रावळ (19, इचलकरंजी), रवींद्र रामू वरूटे (25, आलास, ता. शिरोळ), प्रणव दीपक देशमुख (17, हातीत), हर्ष सुभाष इंगळे (19, मिरज), सांगा शेरण (17, अरुणाचल प्रदेश), यश रणजितसिंह रजपूत (16, सांगली), नदीम रमजान शेख (19, सातारा), ऋषिकेश बाबासाहेब चव्हाण (19, सातारा), शिवकुमार शंकर शिरसकटे (21, खटाव), आशिष ज्ञानू शिंदे (18, आटपाडी, जि. सांगली),  तन्मय वडगावकर (19, आटपाडी), सुखदेव पाटणकर (30, म्हैशाळ, ता. मिरज), वैभव दत्तात्रय सावंत (18, म्हैशाळ, ता. मिरज), प्रतीक दत्तात्रय सावंत (18, म्हैशाळ), धमेंद्र पाटील (28, मिरज), साजिद कनगे (23, मिरज) गुंडू पटेकरी (25, मिरज), प्रीतम सावंत (18, मिरज), मयुरेश सुतार, मोबिन कोंडेकरी (रा. मिरज). 

एकूण 44 विद्यार्थी एका ट्रकमधून रात्री साडेदहा वाजता सांगलीहून पन्हाळ्याला निघाले. तत्पूर्वी, सर्वांनी सांगली येथेच एकत्र भोजन केले. पहाटे दोन वाजता ते पन्हाळा गडावर पोहोचले. तेथे शिवज्योत प्रज्वलित करून अडीच वाजता सांगलीकडे निघाले. त्यांच्या ट्रकच्या पुढे काही जण शिवज्योत घेऊन धावत होते. त्यांच्यापाठोपाठ दोन मोटारसायकलवरून चौघे होते. पाठोपाठ ट्रकमधून इतर विद्यार्थी निघाले होते. शिवाजी पूल वाहतुकीस बंद असल्याने जोतिबा-सादळे-मादळेमार्गे त्यांचा ट्रक कासारवाडी फाटा येथे पुणे-बंगळूर महामार्गावर आला.

तेथून सांगलीकडे जाण्यासाठी निघाले असताना याच महामार्गावर नागाव फाटा येथे शिवज्योतीमधील तेल संपल्याने ते थांबले. ट्रकमधील विद्यार्थ्यांनी उतरून ज्योतीवर तेल घातले. त्याचवेळी काही जण लघुशंकेसाठी गेले. सर्व जण एकत्र येऊन पुन्हा निघण्याच्या तयारीत असतानाच पाठीमागून आलेल्या  भरधाव ट्रकने या विद्यार्थ्यांच्या ट्रकला धडक दिली. हा अपघात एका उड्डाणपुलाच्या भरावावर झाला.

जोरदार धडक

ही धडक इतक्या जोरात होती  की, त्यामुळे पुढे ज्योत घेऊन उभे असणारे आणि मोटारसायकलवरील विद्यार्थी दूर फेकले गेले. मोटारसायकलींचा चक्‍काचूर झाला. तर त्यांचा ट्रक भराववरून रस्त्याच्या खाली कोसळला. त्याचे तोंडही कोल्हापूरऐवजी पुण्याकडे झाले. यावेळी पुढे असणारे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले. एक जण दोन्ही ट्रकमध्ये चिरडला गेला. तर पाठीमागे रस्त्याच्या खाली कोसळलेल्या ट्रकखाली सापडलेले पाच जण गंभीर जखमी झाले.  त्यापैकी तिघांचा सीपीआर इस्पितळात मृत्यू झाला आणि दोघे चिंताजनक स्थितीत आहेत. या ट्रकमध्ये इतर विद्यार्थ्यांपैकी कोणी झोपले होते, तर काही जण जागे होते. अचानक झालेल्या मोठ्या धडकेने सर्व जण जागे झाले; पण त्यापैकी पाच जणांवर काळाने घाला घातला.

प्रचंड आवाज

अपघातामुळे प्रचंड आवाज झाला. त्यामुळे शिरोली औद्योगिक वसाहतीतील काही कामगारांबरोबरच नागाव फाट्यावरील रहिवाशी तेथे धावले. त्यांनी पोलिस आणि 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला दूरध्वनी केला. भारत विसाक ग्रुपच्या (बीव्हीजी) चार रुग्णवाहिका तत्काळ अपघातस्थळी दाखल झाल्या. शिरोली आणि उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांतून प्रथम दहा जखमींना सीपीआरकडे रवाना करण्यात आले.

पाठोपाठ कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले इस्पितळात असणारी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली. त्यातून आणखी जखमींना पाठविण्यात आले. त्यानंतर पोहोचलेल्या वडणगे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे असणार्‍या रुग्णवाहिकेतून मृतांना सीपीआरकडे नेले गेले. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची आणि त्यातील डॉक्टर व कर्मचारी यांनी अत्यंत चांगले मदतकार्य राबविले.

आंबेडकर नगर येथील कार्यकर्त्यांचे मदतकार्य

शिये वार्ताहर कळवतो की, अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली असून घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर विभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव, सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. अपघातातील जखमींना उपचाराकरिता दाखल करण्यासाठी आंबेडकरनगर येथील कार्यकर्त्यांनी मोठे कष्ट घेतले. त्यामुळे  काही जणांचे प्राण वाचले. अपघातात ठार झालेल्यांचे मृतदेह छिन्‍नविछिन्‍न झाले होते. रक्‍ताचा सडा पडला होता. 

ट्रक पलटी झाल्याने ट्रकमध्ये असणारे तरुण एकमेकांवर आदळून जखमी झाले. या धडकेचा आवाज एवढा भीषण होता की, शेजारी असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील नागरिक झोपेतून जागे होऊन घटनास्थळी धावून आले.  ट्रकमधील अनेक तरुण मदतीसाठी हाक घालत होते. तिघांचा मृतदेह रस्त्याच्या मध्यभागी पडला होता. तरुणांच्या मदतीच्या हाकेने तसेच विव्हळण्याने अंगावर शहारे येत होते. कोणी पिण्यासाठी पाणी मागत होते, तर कोणी माझ्या अंगावर पडलेले ओझे काढा, अशी साद घालत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील योगेश रेलेकर, नितीन कांबळे, दीपक बाचणे, युवराज बाचणे,  विजय बाचणे सुकुमार कांबळे, दीपक कांबळे, हे तरुण मदतीसाठी धावून आले. त्यांनी पोलिसांना खबर करण्यापासून ते अ‍ॅम्ब्युलन्सही पाचारण केल्या, तर जखमींना दवाखान्यात लवकर नेता येईल, यासाठी प्रयत्न केले. पलटी झालेल्या ट्रकखाली दोन मोटारसायकल होत्या. त्यावरील दोघे जण जागीच ठार झाले. ट्रक पूर्णपणे त्यांच्या अंगावर पलटी झाला होता. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आल्यावर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

ट्रक चालकाला अटक मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दुपारी अटक केली. सखाराम वामन धनवाड (वय 32, रा. बाबलदरा, मु. पो. जगलपूर, ता. अहमदापूर, जि. लातूर) असे त्याचे नाव आहे. एम एच 12 एम व्ही 367  हा ट्रकही ताब्यात घेण्यात आला आहे, असे करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितले. पुण्याहून बेळगावकडे टाईल्स फरशी व अन्य मटेरियल घेऊन जाणार्‍या ट्रकमधून 26  टनाची मालवाहतूक करण्यात येत होती.

निष्काळजीपणासह हयगयीने व अविचाराने वाहन चालवून विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.

दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक

अपघातातील जखमींपैकी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यामध्ये मस्ताकीम इजाज मुजावर (17, इस्लामपूर), तन्मय वडगावकर (19, आटपाडी, जि. सांगली) यांचा समावेश आहे. जखमींना डोक्याला गंभीर इजा झाल्याने अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना तातडीने मुंबई, पुण्याला हलविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रकृती आणखीन चिंताजनक बनल्याने तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी सांगितले.

घटनास्थळासह शासकीय  रुग्णालयाकडे धाव

 नागाव येथील भीषण दुर्घटनेत सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पहाटे वार्‍यासारखी कोल्हापूर, सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्रात पसरताच, घटनास्थळासह शासकीय रुग्णालयाकडे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकार्‍यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली. प्राचार्य डॉ. जी. एस. परिसवाड, उपप्राचार्य राजेंद्र भोसले, मिरजेचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, दीपक शिंदे, म्हैशाळकर, मकरंद देशपांडे, श्रीनिवास पाटील, सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, प्रा. बी. जी. पाटील, डॉ. उदय दबडे, प्रा. केतन मधाळे, डॉ. ए. के. कांबळे, प्रा. ए. एस. मोरे, के. एस. कदम यांनी जखमींची विचारपूस केली.

पोलिस, महसूलसह विविध खात्यातील अधिकार्‍यांची धावाधाव शिवाजी पुलावरील दुर्घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत नागाव येथे झालेल्या भीषण दुर्घटनेची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत पोलिस, महसूल यंत्रणेसह विविध खात्यांतर्गत अधिकारी, कर्मचारी घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते.

अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, आर. आर. पाटील, सूरज गुरव, कृष्णा पिंगळे, राजेंद्र शेंडेसह पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, तानाजी सावंत, संजय मोरे, अनिल गुजर, दिलीप जाधव, यशवंतराव गवारी, गांधीनगरचे सहायक निरीक्षक सुशांत चव्हाण, शिरोली एमआयडीसीचे सहायक निरीक्षक परशुराम कांबळे आदी अधिकारी घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले.

16 जखमींना  रुग्णालयातून डिस्चार्ज

नागाव दुर्घटनेतील जखमींना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, 16 जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजेंद्र भोसले यांनी सायंकाळी पत्रकारांना गितले. अन्य रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. प्रकृती चिंताजनक असलेल्या तीन विद्यार्थ्यांना आवश्यकता भासल्यास मुंबईला हलविण्याबाबत निर्णय होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी सायंकाळी शासकीय रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
 

मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, सांगलीचे आ. सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सीपीआरला भेट देऊन मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. जखमींची विचारपूस करून सर्व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा देण्याबाबत सूचना केल्या. पालकमंत्री पाटील यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून दुर्दैवी घटनेची माहिती दिली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. जखमींवरील उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करेल, असेही ते म्हणाले.