होमपेज › Kolhapur › राष्ट्रवादीची जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपड

राष्ट्रवादीची जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : विठ्ठल पाटील

दोन्ही खासदार आणि बारापैकी सहा आमदार व त्यातील दोन मंत्री असे एकेकाळी वैभव असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन दशकानंतर बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातच अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ आली आहे. सध्या एक खासदार आणि दोन आमदार अशी परिस्थिती असून खासदारांचे तळ्यात की मळ्यात अशी शंका कार्यकर्त्यांनाच असल्याने येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची अवस्था काय असेल अशी चिंता व्यक्त होत आहे. पक्षाने आयोजित केलेल्या सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलनाची सांगता कोल्हापुरातून होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये यावर विचारमंथन सुरू झाले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा राज्यात सर्वाधिक प्रतिसाद त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून मिळाला. काँग्रेसशी फारकत घेत स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक बळ कोल्हापुरातूनच मिळाले. कलाप्पाण्णा आवाडे, सा.रे.पाटील आणि पी.एन. पाटील वगळता जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांनी पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्यात सदाशिवराव  मंडलिक,  दिग्विजय खानविलकर, बाबासाहेब कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने,  आमदार हसन मुश्रीफ यांचा सक्रिय सहभाग राहिला होता. माने गटामुळे शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी तालुके राष्ट्रवादीचे भक्कम बुरुज बनले. खानविलकर यांनी करवीरसह गगनबावडा तालुक्यात पक्षाचे वर्चस्व निर्माण केले. मंडलिक यांनी कोल्हापूर शहरासह कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यात पक्षाला बळ दिले. तर कुपेकर यांनी गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यात पक्षाची भक्कम मोट बांधली.

राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी कार्यकर्त्यांची केलेली भक्कम बांधणी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर शरद पवार यांना साथ देणारी ठरली. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. सदाशिवराव मंडलिक आणि निवेदिता माने या दोन्ही खासदारांनी ग्रामीण भागात विकासाची गती वाढवत पक्षाचे जाळे अधिकच घट्ट केले. तर दिग्विजय खानविलकर आणि बाबासाहेब कुपेकर या दोन मंत्र्यांनी कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या कामांना न्याय दिला. त्यानंतर मंत्री झालेल्या हसन मुश्रीफ यांनी तर गोरगरिबांचा श्रावणबाळ म्हणून वेगळा ठसा उमटविला. वैद्यकीय मदतीपासून सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना दारोदारी पोहोचविल्या. एकीकडे नेत्यांचे हे धडाकेबाज काम सुरु असतानाच दुसरीकडे कार्यकर्त्यांतील कुरबुर आणि नेत्यांतील गटबाजीच्या वाळवीने पक्ष पोखरण्यास सुरुवात केली. ती इतक्या थराला केली, की आज पक्षाची अवस्था खिळखिळी झाली असल्याचे निष्ठावंत कार्यकर्तेच मान्य करीत आहेत.

नेत्यांची जोपर्यंत एकी होती तोपर्यंत राष्ट्रवादीच्या कोल्हापूरच्या बालेकिल्यावर वाकडी नजर करायची कोणाची हिम्मत झाली नाही. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत कै. खानविलकर यांचा पराभव झाला आणि ते बाजूला पडले. नंतर मंत्री झालेले मुश्रीफ यांच्याकडे जिल्ह्याचे नेते म्हणून पाहिले जावू लागले, पण सदाशिवराव मंडलिकांशी असलेल्या राजकीय वैरत्वातून पक्षात दुफळी निर्माण झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यात वर्चस्वाची पहिली ठिणगी पडली. त्या ठिणगीचे वणव्यात रुपांतर कधी झाले हे कळायच्या आतच जिल्ह्यात पक्षाची वाताहत सुरु झाली. तत्कालीन जिल्हाध्यक्ष लेमनराव निकम आणि मंडलिक यांचे सख्य मुश्रीफ यांना असह्य होत होते. त्यातून निकम बाजूला गेले. त्यानंतर मुश्रीफ यांनी आपल्या मर्जीतील के.पी.पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी विराजमान केले. त्यानंतर त्यांचेच मेव्हुणे ए.वाय.पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले. आज या मेव्हुणे-पाहुण्यातही कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याची पक्षातच चर्चा आहे.

के.पी. आणि ए.वाय. यांच्यातच स्पर्धा?
के.पी. आणि ए.वाय. यांच्यापैकी भावी आमदार कोण यातून स्पर्धा सुरु आहे. म्हणूनच दोघांपैकी भाजपच्या गळाला कोण लागणार असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अशीही जोरदार चर्चा आहे, की विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांचा एक पाय राष्ट्रवादीत आणि दुसरा भाजपमध्ये आहे. असे असेल तर हल्लाबोल कोण आणि कोणाविरोधात करणार व त्यातून साध्य काय होणार याचीच चिंता पक्षातील निष्ठावंत व्यक्त करीत आहेत. 

युवा नेत्यांना डावलले जाण्याचे प्रकार
एकीकडे ज्येष्ठ नेत्यांमध्ये कुरघोड्या सुरु असतानाच युवा नेत्यांना डावलले गेल्याची खंत आहे. यात विशेषतः धैर्यशील माने आणि संग्राम कुपेकर यांची नावे घेतली जातात. दोघेही जिल्हा परिषदेत पदाधिकारी असताना आणि आमदारकीची स्वप्ने पाहत असतानाच ऐन उमेदीच्या काळात नेत्यांकडून खच्चीकरण केल्याची तक्रार ते करीत आहेत. त्यातून संग्राम कुपेकर यांनी पक्षच सोडला, तर धैर्यशील माने स्तब्ध आहेत. ते पक्षाबरोबर असल्याचे आज सांगत असले तरी भविष्यात कोणता निर्णय घेतील याची खात्री नेत्यांनाही देणे कठीण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीतून जाणार्‍या राष्ट्रवादीला कोल्हापुरात अस्तित्वासाठीच झगडण्याची वेळ आली आहे.

साखर कारखान्यांच्या निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी
एकीकडे भाजपच्याविरोधात हल्लाबोल आंदोलन करीत असतानाच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी दोन सहकारी साखर कारखान्यात भाजपलाच सोबत घेतले. भोगावती सहकारी साखर कारखान्यात काँग्रेसचे नेते पी.एन.पाटील यांना विरोध करून तेथे सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपसोबत घरोबा केला. केंद्रात आणि राज्यात असेलल्या भाजपच्या सत्तेच्या ताकदीतून सभासदांचे भले करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर केले.बिद्रीच्या दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यातही शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांची ताकद संपविण्यासाठी भाजपचेच सहकार्य घेतले.  भाजपच्या बळाचा वापर करून राष्ट्रवादीने बिद्रीत सत्ता मिळविली. आज त्याच भाजपच्याविरोधात हल्लाबोल कसा असा प्रश्‍न जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील जाणकार उपस्थित करीत आहेत.
 

Tags : kolhapur district, NCP  


  •