Fri, Jan 18, 2019 10:57होमपेज › Kolhapur › वाहनांचा ताफा, आतषबाजी अन् प्रतिमुख्यमंत्र्यांचे स्वागत

वाहनांचा ताफा, आतषबाजी अन् प्रतिमुख्यमंत्र्यांचे स्वागत

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 1:42AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा, त्यांच्यासोबत असलेले बॉडीगार्ड आणि ते आल्यानंतर हलगी घुमक्याच्या कडकडाटासह झालेली फटाक्यांची आतषबाजी असे वातावरण जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याने अनुभवले. खरे मुख्यमंत्री नव्हते पण त्यांच्यासारख्या दिसणार्‍या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिला गेला आऊटस्टँडिंग चीफ मिनिस्टर या उपाहासात्मक पुरस्काराचे. 

मुख्यमंत्र्यांचे काम चांगले असल्याने त्यांना उपाहासात्मक पुरस्कार देण्याचे आंदोलन आज झाले. या आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे नेते व्यासपीठावर आल्यानंतर चार-पाच वाहनांचा ताफा आला, त्यावेळी मुख्यमंत्री आल्याचे जाहीर करण्यात आले. ते येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हलगी-घुमक्याचा कडकडाट आणि तुतारीच्या निनादात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या आजूबाजूला काळा टी-शर्ट परिधान केलेले, डोळ्यावर काळा गॉगल घातलेले बॉडीगार्ड होते, मुख्यमंत्र्यांच्या आडवे येणार्‍या हटवताना त्यांच्या हालचाली यामुळे खरेच मुख्यमंत्री आल्याचा भास झाला. रामेश्‍वर पत्की यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका निभावली. 

व्यासपीठावर मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांना निवेदन देणार्‍यांची, गार्‍हाणी सांगण्यासाठी भेटणारे लोक, त्यांच्या पीएची लगबग यामुळे तर लोकांना खळखळून हसवून सोडले. एका कार्यकर्त्याने तर शेतकर्‍यांना काय देता की आत्महत्या करू देत असे म्हणताच एकच हस्यकल्लोळ उडाला. सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्रीच व्यासपीठावर आहेत असे समजून सरकारच्या कारभारावर टीका केली. या आंदोलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरा फोटो मात्र राष्ट्रवादीच्या फलकावर झळकला. 

मुख्यमंत्री म्हणून व्यासपीठावर बसलेल्या पत्की यांनीही सरकारवर टीका करताना लोकांची चांगलीच करमणूक केली. एक प्रश्‍न सुटला की दुसरा प्रश्‍न पुढे येतो, दोन वर्षे अभ्यासातच गेली, प्राधिकरणाचा आराखडा बघितला नसेल तर अभ्यास करा. राज्यात कोणी माझा चांगल्या कामासाठी सत्कार केला नाही, माझ्या पक्षानेही मला बेदखल केले पण कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीने माझा सत्कार केल्याचे पत्की म्हणताच पुन्हा हास्याचे फवारे उडाले. शेवटी त्यांनी जनतेची माफी मागून भाषण संपवले.