Mon, Apr 22, 2019 23:49होमपेज › Kolhapur › पालकमंत्र्यांना सत्ता जाण्याचा दृष्टांत

पालकमंत्र्यांना सत्ता जाण्याचा दृष्टांत

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 1:44AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अध्यात्मिक असल्याने त्यांना भाजपा-सेना युती न झाल्यास काँगे्रस आघाडीचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दृष्टांत होऊ लागला आहे, त्यांचे हे वाक्य खरे ठरले तर त्यांचे औक्षण करून त्यांना साखर पेढे भरवू, असा टोला आ. हसन मुश्रीफ यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या वतीने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आऊटस्टँडिंग चिफ मिनिस्टर असा उपहासात्मक पुरस्कार देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  झालेल्या सभेत ते बोलत होते. 

मुश्रीफ म्हणाले, राज्यावर सध्या पाच लाख कोटीचे कर्ज आहे.  राज्याच्या तिजोरीत तर खडखडाट आहे, इंधन दरवाढ, कर्जमाफीतील फसवणूक, रेशनकार्डवर गहूऐवजी मका देण्याचा निर्णय यामुळे समाजातील सर्व घटक अस्वस्थ आहेत. यापैकी एक जरी मुद्दा खोटा निघाला तर राष्ट्रवादी काँगे्रस जाहीर माफी मागायला तयार आहे. 

ते म्हणाले, केंद्राकडे साखरेचे दर प्रती क्विटल 3200 रुपये निश्‍चित करण्याची मागणी केली ती पूर्ण झाली नाही. पॅकेज दिले पण त्यातून शेतकर्‍यांची एफआरपी देता येत नाही. गायीच्या दुधाला अनुदान नाकारून  अन्याय करण्याचे काम सुरू आहे. 

खा. धनंजय महाडिक म्हणाले, सरकारच्या चुकीच्या निर्णयाने सामान्यांबरोबरच व्यापारी, उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने  सरकारविरोधातील भावना समोर आल्या आहेत. 

यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील,  के. पी. पाटील,  आर. के. पोवार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक  शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांची भूमिका निभावलेल्या रामेश्‍वर पत्की यांना  उपाहासात्मक पुरस्कार देण्यात आला. यानंतर  शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले. व्यासपीठावर शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील,   जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर,  मदन कारंडे, जहीदा मुजावर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अनिल घाटगे यांनी केले. 

ए. वाय. यांची घेतली फिरकी

ए. वाय. पाटील मध्यंतरी भाजपच्या वाटेवर होते. हा धागा पकडून मुख्यमंत्री बनून व्यासपीठावर आलेल्या पत्की यांनी  ए. वाय. यांचा उल्लेख दादासमवेत (पालकमंत्री) ज्यांनी माझी अनेकदा भेट घेतली ते ए. वाय. असे म्हणताच हस्याचे फवारे उडाले. 

खा. महाडिक-मुश्रीफ अबोला कायम

या आंदोलनाच्या निमित्ताने खासदार महाडिक व मुश्रीफ एका व्यासपीठावर आले, जवळजवळ बसले पण त्यांच्यातील अबोला कायम राहिला. भाषणात मात्र खासदारांनी जिल्ह्याचे नेते म्हणून मुश्रीफ यांचा उल्लेख केला. मुश्रीफ यांनीही त्यांचे नाव घेतले.