Tue, Jul 16, 2019 09:54होमपेज › Kolhapur › नगरसेवक चव्हाण यांच्या घरावर मोर्चा

नगरसेवक चव्हाण यांच्या घरावर मोर्चा

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांच्या शिवाजी पेठेतील घरावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा बुवा चौकात अडवून कार्यर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी चव्हाण समर्थकही मोठ्या संख्येने जमल्याने शिवाजी पेठेत तणावाचे वातावरण होते. खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन चव्हाण यांनी राजीनामा देऊन पुन्हा विजयी होऊन दाखवावे, असे जाहीर आव्हान उत्तम कोराणे, अजित राऊत यांनी मोर्चासमोर बोलताना दिले. यावेळी संतप्त महिला कार्यकर्त्यांनी नगरसेवक चव्हाण यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. 

उभा मारुती चौकात सकाळी दहा वाजल्यापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू लागले होते. माजी महापौर आर. के. पोवार शहराध्यक्ष राजेश लाटकर, कार्याध्यक्ष अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सव्वाअकराच्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली. उभा मारुती चौकातून मोर्चा बुवा चौकाकडे रवाना झाला. रिक्षामध्ये लाउडस्पीकर ठेवून घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चाच्या अग्रभागी महिला कार्यकर्त्या घोषणा देत होत्या. बुवा चौकात मोर्चा येताच पोलिसांनी कडे करून मोर्चा अडविला. मोर्चा येथून पुढे सोडणार नाही, अशी पोलिसांनी भूमिका घेतली. त्यामुळे आंदोलकांनी बुवा चौकात रस्त्यावरच ठाण मांडले. या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पैशासाठी पेठेची बदनामी करणार्‍या नगरसेवक चव्हाण यांचा धिक्कार असो, अशा घोषणा देऊन बुवा चौक दणाणून सोडला. 
यावेळी पोलीसांनी आंदोलकांना पुढे जाउ नका अशी सूचना केली. मात्र घोषणाबाजी सुरुच राहील्याने पोलीसांनी बळाचा वापर केला. सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. पोलीस दलाच्या दोन व्हॅनमधून आंदोलकांना नेण्यात आले. आंदोलकांनी व्हॅनमध्येही घोषणाबाजी केली.

नगरसेवक चव्हाण विरोधक आणि समर्थक असे दोन्ही बाजुला परस्परविरोधी कार्यकतेे मोठ्या संख्येने जमल्याने पोलीसांनी बुवा चौकात ठाण मांडले. बुवा चौकात रस्त्यातच पोलीस व्हॅन लावून दोन्ही बाजुचे लोक आमने सामने येणार नाहीत याची खबरदारी घेतली. 

मोर्चेकर्‍यांना ताब्यात घेतल्यानंतर चव्हाण समर्थक सरदार तालीमजवळून निघुन गेले. वेताळ माळ तालीमजवळ कार्यकर्त्यांचा मोठा जमाव होता. शहर पोलीस उपअधिक्षक डॉ.प्रशांत अमृतकर यांनीशिवाजी पेठेत फेरी मारुन जमावास घरी जाण्याचे आवाहन केले.  

अजित राउत म्हणाले, मोर्चा पेठेविरोधात नसून पैसे खाऊन शिवाजी पेठेचीबदनामी करणार्‍या अजिंक्य चव्हाण यांच्या विरोधात आहे. काल आलेल्या या पोरास कोराणे आणि राऊत या कुटुंबाने पुढे आणले, मोठे केले आहे. असे असताना त्याने पैशासाठी पक्षाशी धोका केला आहे. आम्ही बुजुर्गाचे ऐकुन अजिंक्यला पाठींबा दिला. निवडून आणले. हिम्मत असेल तर त्याने राजिनामा देउन पुन्हा विजयी होउन दाखवावे कोराणे आणि राऊत कुटुंबे पेठ सोडून जातो. दिड कोटी रुपये घेऊन राजकारणात राहणार्‍या चव्हाण याना हे पैसे किती दिवस पुरतील. 

उत्तम कोराणे म्हणाले, या पेठेत कोराणे आणि राऊत कुटुंब म्हणेल ते घडते. पैसे घेउन स्वत:ला विकणे हे चुकीचे आहे. अजिंक्यला कोण ओळखत होतं गाडीच्या काचा कधी खाली न करता हा फिरला नाही. चार पोर जमा करुन दाखवावीत. हिम्मत असेल त्याने राजिनामा देऊन पुन्हा निवडणूक जिंकुन दाखवावी. 

आर. के.पोवार म्हणाले, हा मोर्चा पेठेविरोधात नसून नगरसेवक चव्हाण यांच्या विरोधात आहे. नगरसेवक चव्हाण यांचा राजीनामा मागण्यासाठी आम्ही आलो आहोत. चव्हाण यांना स्वाभिमान असेल तर त्यांनीं राजीनामा द्यावा. आ. मुश्रीफांना बदनाम केले जात आहे. राष्ट्रवादी पक्षाने कधी जातीधर्माचे राजकारण केले नाही. सर्व जातीधर्माच्या लोकांना न्याय दिला आहे. शहर अध्यक्ष राजेश लाटकर म्हणाले, मेघा पाटील या बहुजन समाजातील महिलेची संधी अजिंक्य चव्हाण यांनी हिरावून घेतली असून ते पेशावाईच्या राजकारणातलं बाहुल बनले आहे. 

मोर्चात उपहापौर सुनील पाटील,   आदील फरास, महेश सावंत, परिक्षीत पन्हाळकर, रमेश पोवार, महादेव पाटील, शीतल तिवडे, सुनीता राऊत, संजय पडवळ, सुहास साळोखे, राजू जाधव, निरंजन कदम, बाबा सरकवास, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, संजय कुराडे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

चव्हाण समर्थकांची गर्दी
दरम्यान, राष्ट्रवादीचा मोर्चा येणार या पार्श्‍वभूमीवर अजिंक्य चव्हाण यांच्या निवासस्थानी आणि वेताळ माळ तालमीजवळ चव्हाण समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी सकाळपासूनच कार्यकर्त्यांचा राबता होता. स्थायी सभापती आशिष ढवळे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, कमलाकर भोपळे,  किरण नकाते, किरण शिराळे, भाजपचे महेश जाधव, अफजल पिरजादे, संतोष गायकवाड, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, सुरेश जरग आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सरदार तालमीजवळ जमा झाले. यावेळी महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती.   

दहा मिनिटांत जा; अन्यथा गाड्या फोडू
मोर्चानंतर पिंटू राऊत वेताळ माळ तालीम परिसरात गेले असता, विरोधी आघाडीच्या  नगरसेवकांसह मोठा जमाव आढळला. यावेळी राऊत यांनी जमावास उद्देशून दहा मिनिटांत येथून सर्वांनी जावे; अन्यथा स्थानिक युवक गाड्या फोडतील, असा इशारा दिला. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे तेथून अनेकांनी काढता पाय घेतला; मात्र स्थानिक युवकांनी एक-दोन युवकांना मारहाण केल्याचे समजते.