Fri, Apr 26, 2019 09:29होमपेज › Kolhapur › जयंत पाटलांसाठी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊ : मुरलीधर जाधव

जयंत पाटलांसाठी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊ : मुरलीधर जाधव

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 12:36AM कोल्हापूर : प्रतिनिधी

स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी बंडखोरी केली. या बंडखोरीला नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांची फूस असल्याचा संशय निर्माण करण्यात येत आहे. त्यांच्यावर दाखवलेला अविश्‍वास आपल्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आपण राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे माजी स्थायी समिती सभापती  मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
जाधव म्हणाले, प्रा.जयंत पाटील यांनी  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी प्रयत्न केले. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी  त्यांची धडपड,  नियोजन,  व पक्षाबद्दलची निष्ठा या सर्व गोष्टी मी जवळून पाहिल्या आहेत.

प्रा. पाटील यांनी पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांची आ. मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा घडवून आणली होती;  पण तरीही मते फुटली. प्रा. पाटील यांच्याबद्दल गैरसमज पसरवला जात असताना राष्ट्रवादीचे नेते शांत आहेत. या आरोपामुळे प्रा. पाटील महापालिकेत सक्रिय सहभागी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना मानसन्मान मिळत  असेल तर मी पुन्हा पक्षात राहण्याचा विचार करेन अन्यथा राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा इशारा त्यांनी दिला.

जाधव राष्ट्रवादी पक्षात  राहतील  : प्रा. पाटील

 मला सन्मान मिळत नाही म्हणून मुरलीधर जाधव पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे मला समजले आहे. फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो; पण  होऊ शकला नाही. माझे व आ. मुश्रीफ यांचे मित्रत्वाचे नाते आहे. स्थायी समिती सभापती निवडीनंतर त्यांची माझी वैयक्तिक भेट झाली नाही. पण फोनवरून  संपर्क होतो. जाधव यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाला आहे. तो दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.  जाधव पक्षातच राहतील, असे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. जाधव यांनी अचानक असा निर्णय का घेतला यासाठी जाधव यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता, पण ते फोन उचलत नव्हते. रात्री काँग्रेस व राष्ट्रवादी  काँग्रेसचे नेते त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. या चर्चेतून त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे राजू लाटकर यांनी सांगितले.