Sat, Mar 23, 2019 18:09होमपेज › Kolhapur › राष्ट्रवादीचे कोल्हापुरात आज व उद्या हल्लाबोल आंदोलन

राष्ट्रवादीचे कोल्हापुरात आज व उद्या हल्लाबोल आंदोलन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आयोजित केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा चौथा आणि अखेरचा टप्पा सोमवारपासून (दि. 2) कोल्हापुरातून सुरू होत आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्याच्या विविध भागात सभा झाल्यानंतर बुधवारपासून सांगली जिल्ह्यात आंदोलन होईल.

दरम्यान, या आंदोलनासाठी पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सौ. सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे आगमन रविवारी रात्री कोल्हापुरात झाले. वरील सर्व नेते आणि जिल्ह्याचे नेते आ. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.

महागाई, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्‍न यासह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षाने हल्लाबोल आंदोलन केले आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात नागपूर 
येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. पश्‍चिम महाराष्ट्रातून आंदोलनाची सांगता होणार आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून सोमवारी सकाळी होत आहे. सर्वप्रथम सकाळी आठ वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन साकडे घालून आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सोमवारी सकाळी दहा वाजता पहिली सभा मुरगूड, दुपारी तीन वाजता गारगोटी आणि सायंकाळी सहा वाजता कोल्हापुरातील दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता नेसरी आणि सायंकाळी सहा वाजता जयसिंगपूर येथे जाहीर सभा होणार आहेत.

या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, आदिल फरास, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कल्पेश चौगुले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगीता खाडे उपस्थित होत्या.


  •