होमपेज › Kolhapur › सामान्यांचे जगणे मुश्कील

सामान्यांचे जगणे मुश्कील

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी

शेतकरी, व्यापार्‍यांसह गोरगरिबांचे जगणे मुश्कील करणार्‍या भाजप सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्‍लाबोल आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने ‘भाजप चलेजाव’ आंदोलनाचे रणशिंग फुंकले. 1 डिसेंबरपासून यवतमाळमधून दिंडी काढून 12 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर हजारोंच्या उपस्थितीत धडक देण्याचा निर्धारही करण्यात आला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आ. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली दुपारी साडेबारा वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. खा. धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, आ. संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, माजी आमदार के. पी. पाटील, अनिलराव साळोखे, युवराज पाटील, आर. के. पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी निवेदन स्वीकारले. 

आसूड मुश्रीफ यांच्या हातात

दसरा चौकातून मोर्चा सुरू झाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचेपर्यंत दोन पोतराज आसुडाचे फटकारे अंगावर ओढून घेत होते. असेम्ब्ली रोडवर आल्यावर मात्र आ. मुश्रीफ यांनी आसूड हातात घेऊन तो जमिनीवर मारण्यास सुरुवात केली. 

सरकारला श्‍वेतपत्रिका काढायला लावणार : आ. मुश्रीफ

समाजातील सर्व घटक नाराज असतानाही सरकार कर्जाचा डोंगर वाढवत निघाले आहे, त्यांच्या या कारभाराची श्‍वेतपत्रिका काढायला लावणार आहे. जगण्याचे प्रश्‍न बिकट होत असताना भाजप व शिवसेना एकमेकांवर टीका करण्यात मश्गूल असल्याने जनतेने बघायचे कुणाकडे, हा प्रश्‍न असल्यानेच राष्ट्रवादीने 
आंदोलन हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

...तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही : खा. धनंजय महाडिक

शरद पवार कृषिमंत्री असताना विनाअट 72 हजार कोटींची कर्जमाफी झाली. आता मात्र अटी-शर्थींमध्ये अडकवून लाभापासून वंचित ठेवले जात आहे. विनाअट कर्जमाफी करून सात-बारा कोरा करण्याची मागणी मान्य होईपर्यंत हिवाळी अधिवेशन चालू दिले जाणार नाही, असा इशारा खा. धनंजय महाडिक यांनी दिला.  

सरकार खाली खेचण्याची सुरुवात :  के. पी. पाटील

राज्याच्या डोक्यावर तीन वर्षांपूर्वी दोन लाख कोटी असणारे कर्ज पावणेचार लाख कोटींवर पोहोचवण्याचे काम या सरकारने केले आहे. तीन वर्षांच्या कारभाराला कंटाळूनच आता जनता रस्त्यावर उतरली आहे. सरकारला सत्तेवरून खेचण्याची आजपासून सुरुवात होत आहे. 

काही नेत्यांची आंदोलनाकडे पाठ

राष्ट्रवादीच्या हल्‍लाबोल आंदोलनात ताराराणी आघाडीचे नेते व ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर हे सक्रियपणे सहभागी झाले. तर राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड, निवेदिता माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पाठ फिरवली. शहरातील नगरसेवक फिरकलेच नाहीत. जि.प.चे विनय पाटील, सतीश पाटील, प्रियांका पाटील हे तीनच सदस्य आले.

शेतकरी खोत यांनी जिंकली मने

हल्‍लाबोल मोर्चात चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील शेतकरी तानाजी खोत या शेतकर्‍याने भाषणात सरकारी धोरणांवर आसूड ओढले. कर्जमाफीची ऑनलाईन प्रक्रिया ही वाट लावीन प्रक्रिया आहे. हे सरकार जाहिरातीत हिरो आणि कामात झीरो आहे, असे सांगताच टाळ्या पडल्या.

लक्षवेधी घोषणा फलक

भाजप सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारे घोषणा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यात ‘तुमची नोटाबंदी, ‘जीएसटी’ अडचणीत आली उद्योग-शेती’, ‘खड्डेच खड्डे रस्त्यांवर, सरकार नाही भानावर’, ‘आरोग्य सेवेचं झालं हसं, सर्वसामान्यांनी जगायचं तरी कसं’, ‘सरसकट कर्जमाफी द्या, सात-बारा ताबडतोब कोरा करा’ आदी फलकांचा समावेश होता.

प्रमुख मागण्या अशा...

सरसकट कर्जमाफी द्या, सात-बारा कोरा करा   
गायीच्या दुधाला 30, तर म्हशीच्या दुधाला 40 रुपये दर द्या  
फसव्या जाहिराती बंद करून जनतेच्या पैशांची बचत करा   
कृषिपंपांचे वीज बिल माफ करा   
जीवनावश्यक वस्तूंवरील ‘जीएसटी’ कमी करा    
पेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’च्या कक्षेत आणा  
राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नेमावा 
रस्त्यांची कामे सुरू करून त्या खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करा