Thu, Jul 18, 2019 06:33होमपेज › Kolhapur › विकासाच्या नावाखालील प्रकल्प एन. डी. यांनी रोखले : मेधा पाटकर

विकासाच्या नावाखालील प्रकल्प एन. डी. यांनी रोखले : मेधा पाटकर

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 16 2018 12:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी

विकासाच्या नावाखाली प्रकल्प माथी मारण्याचे सरकारचे प्रयत्न नेहमीच सुरू असतात. केवळ मोठे प्रकल्प उभा केले म्हणजे रोजगार निर्मिती होते, विकास होतो, असेे भासविण्याचा प्रयत्न केला जातो. असे प्रकल्प ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी चळवळीतून रोखले आहेत. ही चळवळ पुढे चालू ठेवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जनआंदोलनाच्या नेत्या श्रीमती मेधा पाटकर यांनी रविवारी केले. जातीयवादी शक्‍तींना रोखण्यासाठी विवेकाचा जागर घालण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोेेेेलत होत्या. यावेळी प्रा. पाटील यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला.

श्रीमती पाटकर पुढे म्हणाल्या, पुरोगामी विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम प्रा. एन. डी. पाटील यांनी केले आहे. सध्याचे राजकारण मूल्यहीन झाले आहे. राजकारणाची गटारगंगा झाली आहे. अशा परिस्थितीत जातीयवादी शक्‍तींविरुद्ध एन. डी. लढत आहेत. बुद्धीजीवी आणि श्रमजीवी यांना एकत्र आणण्याचे काम सातत्याने प्रा. पाटील यांनी केले आहे. भांंडवलशाही, जातीयवादी शक्‍ती यांच्याविरोधात त्यांनी आवाज उठवला आहे.

केवळ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरकारला रस असतो. मोठे प्रकल्प आणले म्हणजेच विकास होतो, या भ्रामक कल्पनेत सर्व जण आहेत. पर्यायी विकास नीती त्यांच्याकडे नाही. त्यामुळेच संघर्ष निर्माण होतो. गुहागरचा एन्‍रॉन प्रकल्प असेल किंवा रायगडची चळवळ असेल, सेझचे आंदोलन असेल ही सर्व आंदोलने मोठी झाली. प्रकल्प आणतानाच कोकणासारखा परिसर पाहिला जातो. त्यामुळे जल, जंगल आणि जमिनीचा र्‍हास होत असतो. ते वाचविण्यासाठी लोकचळवळ उभा करतात. त्या  चळवळींना प्रा. पाटील यांची नेहमीच प्रेरणा मिळाली आहे, असे त्या म्हणाल्या.

आ. जयंत पाटील म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत कोठेही नसणार्‍या शक्‍ती आता सत्तेत बसल्या आहेत. त्यामुळे प्रतिगामी शक्‍ती वाढत आहेत आणि त्यांना विरोध करणारी बहुजन, कष्टकर्‍यांची चळवळीची ताकद कमी होत चालली आहे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्या झाल्यानंतर त्यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी बहुजन समाजाने जी आपली ताकद दाखवायला हवी होती, ती ताकद न दाखविल्यामुळेच आजही त्यांचे मारेकरी सापडू शकत नाहीत. संविधान बदलण्याचा आणि संविधान चुकीचे आहे असे सांगणार्‍यांची हिंमत वाढत आहे. ते रोखण्याची जबाबदारी आपणावर आहे.

सत्काराला उत्तर देताना प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, नव्या मनुवादाचा उदय होत आहे. त्यामुळे आजही महाराष्ट्राला सत्यशोधक विचाराची आवश्यकता आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेली चळवळ पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू ठेवली. बहुजन समाजाला शिक्षित करण्याचे काम कर्मवीरांनी केले आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लोकांना विवेकी बनविण्याचा प्रयत्न केला. कर्मवीरांनी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार केवळ आपल्यापुरते मर्यादित न ठेवता ते इतरांमध्येही रुजविण्याचे काम केले. सरकार बेफिकीर आहे. त्यांच्यामुळेच आपण डॉ. दाभोलकरांसारख्या कार्यकर्त्याला मुकलो. त्यांची उणीव भरून निघू शकत नाही; पण त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.

यावेळी महादेव भोईभार, डॉ. शैलाताई दाभोलकर, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचीही भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
सरोज पाटील यांनी मने जिंकली

प्रा. एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील या कार्यक्रमात सहसा भाषण करण्याचे टाळत असत. आजच्या सोहळ्यात मात्र त्यांनी भाषण केले आणि सर्वांची मने जिंकली. त्यांनी आपल्या आयुष्याचा पट आज श्रोत्यांसमोर मांडला.