Wed, Apr 24, 2019 08:24होमपेज › Kolhapur › लोकसभा लढवण्याचे मुश्रीफ यांचे संकेत

लोकसभा लढवण्याचे मुश्रीफ यांचे संकेत

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 08 2018 1:31AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

मी खासदार व्हावे असे अलीकडे माजी आमदार के. पी. पाटील यांना सारखे वाटू लागले आहे, सारखा ते माझा तसाच प्रचार करतात. कारण, त्यांना मंत्री व्हायची घाई झालेली आहे, अशी टोलेबाजी आज राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी केली. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासमोरच हे वक्‍तव्य करून मुश्रीफ यांनी लोकसभेसाठी आपण तयार असल्याचे संकेतच दिले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले आहे, त्याचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी पुरस्कृत ना. हसन मुश्रीफ फौंडेशन यांच्या वतीने गेल्यावर्षी घेतलेल्या गणराया अ‍ॅवॉर्ड स्पर्धेचा बक्षीस समारंभ आ. पाटील यांच्या हस्ते झाला, त्यावेळी मुश्रीफ बोलत होते. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याच्या घोषणेचा उल्लेख करून मुश्रीफ म्हणाले, गेल्या गणेशोत्सवात पाटील यांनी डॉल्बी मुक्‍तीसाठी फार मोठे प्रयत्न केले; पण यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ही घोषणा करण्यासाठी कालचा दिवस का निवडला, हे माहीत नाही. गांभीर्याने ते बोलले असतील काय, असा प्रश्‍न प्रदेशाध्यक्षांनी मला विचारला. खरोखरच त्यांनी गांभीर्याने घोषणा केली असेल, तर मग त्यांच्या घोषणेचे स्वागत करतो व त्यांना शुभेच्छा देतो, कारण त्यांचा हा स्वभावच नव्हता. त्यांच्या चार वर्षांच्या कारकीर्दीत रस्त्यांची अवस्था काय, सर्वात दुःखी कोण, या विषयावरील देखावे यावर्षीच्या गणेशोत्सवात सादर करावेत. 

भविष्य कळल्यानेच पालकमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय : जयंत पाटील

भविष्यात काय होणार, हे अलीकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना अगोदर समजते. त्यामुळे निवडणूक लढवण्यात आता राम राहिलेला नाही, म्हणून संन्यास घेऊन आबादी आबाद राहिलेले बरे, या हेतूनेच त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असेल, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी लगावला.