Fri, Apr 26, 2019 09:54होमपेज › Kolhapur › नाही नाही म्हणत मुश्रीफ भोजनाला गेलेच !

नाही नाही म्हणत मुश्रीफ भोजनाला गेलेच !

Published On: Apr 23 2018 1:50AM | Last Updated: Apr 23 2018 1:42AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सकाळी नाही म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांना रात्री मात्र, खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी भोजनासाठी उपस्थित राहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच उपस्थित राहण्याची थेट सूचना केल्याने मुश्रीफ यांनी ‘स्नेह भोजना’ला हजेरी लावली. नाही म्हणणारे आ. मुश्रीफ रात्री खा. महाडिक यांच्या निवासस्थानी आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

आ. मुश्रीफ आणि खा. महाडिक यांच्यात छुपा कलह सुरू आहे. खा. महाडिक यांच्या पक्षीय पातळीवरील कार्यपद्धतीवर आ. मुश्रीफ यांनी अनेकदा जाहीरपणे भाष्य केले आहे. खा. महाडिक यांनीही आपण राष्ट्रवादी काँग्रेसचेच खासदार आहोत, असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर खा. महाडिक यांनी पवार यांच्यासाठी भोजनाचे आयोजन केले होते. त्याकरिता आ. मुश्रीफ, के. पी. पाटील यांनाही निमंत्रण देण्यात आले होते.

रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आ. मुश्रीफ आणि के. पी. यांनी आपण पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे खा. महाडिक यांच्याकडे रात्री भोजनासाठी जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत आपण खा. महाडिक यांच्याशी बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी के. पी. यांनी आपण खा. महाडिक यांच्याकडे भोजनासाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगत पूर्वनियोजित कार्यक्रमाची पत्रिका दाखवली. त्यांना पवार यांनी परवानगी दिली. त्यापाठोपाठ मुश्रीफ यांनीही कार्यक्रमाची पत्रिका दाखवत, आपणही उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले. त्यावर पवार यांनी तुम्हाला ‘एस्क्यूज’ नाही. तुम्हाला रात्री यावे लागेल असे सांगितले. यानंतर आ. मुश्रीफ कागल तालुक्यातील कार्यक्रम आटोपून रात्री साडे आठ वाजता खा. महाडिक यांच्या निवासस्थानी आले. तत्पूर्वी पाऊण तास आधीच पवार आले होते.

दरम्यान, मुश्रीफ, महाडिक यांनी पवार यांच्याशी साखर उद्योगावर आलेल्या संकटाबाबत सविस्तर चर्चा केली. आपण कृषिमंत्री असताना साखर उद्योगावर आलेल्या संकटावर  मात करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला होता, त्याबाबत पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे कळविले असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, आर.के. पोवार, व्ही. बी. पाटील, समीर शेठ आदी उपस्थित होते.

Tags : Kolhapur,  Mushrif,  meal