Mon, Aug 26, 2019 00:41होमपेज › Kolhapur › शाहू जन्मस्थळामधील संग्रहालयाचे काय?

शाहू जन्मस्थळामधील संग्रहालयाचे काय?

Published On: Jun 24 2018 1:56AM | Last Updated: Jun 23 2018 11:36PMकसबा बावडा : प्रतिनिधी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळामधील संग्रहालयाचे काम कोण करणार, हा गुंता निर्माण झाला आहे. वस्तूसंग्रहालय उपसमिती हे काम पुरातत्त्व विभागामार्फत व्हावे, यासाठी आग्रही आहे. तर पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभाग खुल्या ई- निविदेद्वारे काम करून घेण्याच्या तयारीत आहे. 

शाहू जन्मस्थळ अर्थात लक्ष्मी विलास पॅलेस ही वास्तू 1977 साली राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली. या वास्तूच्या देखभाल-दुरुस्तीसाठी 2000 पर्यंत पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकला नाही.  2009-10 मध्ये वित्त आयोगाकडून 1 कोटी 14 हजार, 20011-12, व 12-13 मध्ये कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीकडून 4 कोटी 19 लाख 71 हजार 605 रुपये, 13-14 मध्ये राज्य सरकारकडून 1 कोटी 36 लाख 813 रुपये असा एकूण 6 कोटी 56 लाख 59 हजार 118 रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यातून स्मारकाची स्थापत्यविषयक सर्व कामे पूर्ण झाली आहेत.

अंतिम टप्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित वस्तुसंग्रहालयाची उभारणी करण्याचे निश्‍चित झाले. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त उपसमितीने तयार केलेल्या 13 कोटी 42 लाखांच्या आराखड्यात प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली नाही. संग्रहालयाचे काम टप्याटप्याने करण्याचे निश्‍चित झाले. 

जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार एकूण आराखड्यातील पहिल्या टप्यात 2 कोटी 25 लाख रुपयांच्या कामाचा आराखडा तयार करून त्यास संबंधित विभागांची मंजुरी मिळावी. संग्रहालय उभारणीच्या कामासाठी कार्यान्वयक अधिकारी म्हणून सहा. अभिरक्षक, कोल्हापूर वस्तुसंग्रहालय कोल्हापूर यांची नेमणूक करण्यात आली. फेब्रुवारी 2017 मध्ये या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. उपसमितीने संग्रहालयाचे काम पुरातत्त्व विभागामार्फतच व्हावे, असा ठराव करून तो सप्टेंबर 2017 मध्ये शासनास पाठवला.

2002 मध्ये शासन निर्णय होऊन पुरातत्त्व वस्तुसंग्रहालये विभागातील सर्व कामे खुल्या निविदांद्वारे करण्याचे निश्‍चित झाले. त्यामुळे शाहू जन्मस्थळाचे काम विभागामार्फत करण्याची मागणी फेटाळली गेली. 20 फेबु्रवारी 2018 ते 15 मे 2018 दरम्यान पुन्हा खुली ई-निविदा मागविण्यात आली. यामध्ये 5 निविदाधारकांनी निविदा भरल्या. यापैकी 2 अपात्र ठरले. उर्वरितमधीलही एक संग्रहालय कामाचा अनुभव नसणारा असल्याचे समजते. विभागाचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.

ई-निविदेमध्ये पात्र ठरलेल्या ठेकेदाराच्या यापूर्वीच्या कामाबद्दल शाहूप्रेमींनी तक्रारी नोंदविल्या होत्या. ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करावे, अशी मागणी करण्यात आली होती. ज्यांना पुरातत्त्व खात्याकडील केवळ स्थापत्य कामाचा अनुभव आहे ते संग्रहालयाचे काम दर्जेदार करू शकणार नाहीत, त्यामुळे शासन निर्णय विशेष बाब म्हणून बदलावा व हे काम पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करावे, अशी मागणी उपसमितीने पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. जर अशा पद्धतीने काम केले तरच ते ऐतिहासिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे होईल, असेही उपसमितीने स्पष्ट केले आहे. 

2016-17 या आर्थिक वर्षात पहिल्या टप्यातील कामासाठी दोन कोटींहून अधिक निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, काम कोणी करावे, हा गुंता कायम आहे. काम दर्जेदार व्हावे, यासाठी शाहू जयंतीपूर्वी याचा निर्णय व्हावा, अशी अपेक्षा शाहूप्रेमींतून व्यक्त होत आहे.
 
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी घेतलेले क्रांतिकारी निर्णय, दिलेले हुकूम, त्याची केलेली प्रभावी अंमलबजावणी आजही मार्गदर्शक ठरत आहे.  त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा.
- वसंतराव मुळीक, अध्यक्ष, मराठा महासंघ