होमपेज › Kolhapur › ख्रिश्‍चन धर्मगुरूवर खुनी हल्‍ला; प्रकृती गंभीर

ख्रिश्‍चन धर्मगुरूवर खुनी हल्‍ला; प्रकृती गंभीर

Last Updated: Feb 25 2020 1:23AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर चर्च कौन्सिलचे  कार्यकारी चिटणीस आणि धर्मगुरू जगन्नाथ आकाराम हिरवे (वय 48, रा. न्यू शाहूपुरी) यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा अनोळखी महिलेने खुनी हल्‍ला केला. कोयत्याने गळ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यांना तातडीने राजारामपुरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळ व रुग्णालयात नातेवाईक, समाजातील प्रमुखांनी गर्दी केली होती. नागाळा पार्क येथील चर्चसमोरील रस्त्यावर ही घटना घडली.

गळ्यावर झालेल्या खोलवरील हल्ल्यामुळे अतिरक्‍तस्राव होऊन हिरवे यांची प्रकृती गंभीर बनली आहे. सीपीआर येथील प्राथमिक उपचारानंतर तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रात्री उशिरा तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. जागेच्या वादातून हा प्रकार घडला असावा, असा संशय शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी व्यक्‍त केला.  हल्ल्यानंतर संबंधित महिला धारदार शस्त्रांसह कनाननगरच्या दिशेने अंधारातून पलायन केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, नागाळा पार्क येथील कोल्हापूर चर्च कौन्सिलचे कार्यकारी चिटणीस या नात्याने हिरवे यांच्यावर चर्चची मालमत्ता, न्यायप्रविष्ट प्रकरणांचा पाठपुरावा व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी असते. चर्चच्या न्यायप्रविष्ठ कामानिमित्ताने शमूवेल मधुकर रुकडीकर (वय 35) याच्यासमवेत ते सोमवारी सकाळी इस्लामपूर येथे गेले होते. तेथील न्यायालयाचे कामकाज आटोपून दोघेही रात्री साडेआठला नागाळा पार्क येथील कमानीजवळ येऊन थांबले होते.

हिरवे यांनी घराकडे तातडीचे काम आहे. त्यामुळे आता चर्चमध्ये न जाता तेथील कपाटात ठेवलेली बॅग घेऊन येण्याची सूचना रुकडीकर यांनी केली. रुकडीकर चर्चमध्ये जाऊन बॅग घेऊन बाहेर येत असतानाच हिरवे यांच्या किंचाळण्याचा आवाज आला. अनोळखी महिलेने गळ्यावर कोयत्याने वर्मी हल्‍ला केल्याने हिरवे रक्‍ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळले होते. 

कोल्हापूर चर्च कौन्सिलचे चिटणीस आणि धर्मगुरूवर खुनी हल्ल्याची बातमी समजताच नातेवाईकासह समाजातील प्रमुख मंडळींनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. हल्‍लेखोर महिलेचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.