होमपेज › Kolhapur › राजकीय वर्चस्व वादातून घडले खुनी सूडनाट्य

राजकीय वर्चस्व वादातून घडले खुनी सूडनाट्य

Published On: Apr 24 2018 1:27AM | Last Updated: Apr 23 2018 11:57PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

‘खून का बदला खून‘... सूड भावनेतून पाचगावात सूडनाट्य सुरू झाले. 13 फेबु्रवारी 2013 रोजी पाचगावचा माजी सरपंच अशोक पाटील याचा गुंड दिलीप जाधवने (डी.जे.) भरदिवसा गोळ्या झाडून खून केला. तर दिलीप जाधवचा मेहुणा धनाजी गाडगीळ याला डिसेंबर 2013 मध्ये तलवारी, जांबियाच्या सहाय्याने वार करून संपविण्यात आले.पाचगावच्या राजकारणात पोवार बंधूंच्या खुनापासून सुरू झालेल्या या सूडसत्रात गाडगीळ हा चौथा बळी ठरला. करवीर तालुक्यात 1954 साली पाचगाव ग्रामपंचायतीची स्थापना झाली. साधारण 1990 पर्यंत गावात शांतता नांदत होती. शहराचा विस्तार वाढत जाऊन पाचगावला मोठे महत्त्व प्राप्त झाले. ग्रामपंचायतीला जवळपास उपनगराचे स्वरूप प्राप्त झाले. यातून 1997 नंतर खर्‍या अर्थाने पाचगावच्या राजकारणाला वळण मिळाले.

पाचगावचे रक्तरंजित राजकारण

अशोक पाटील व दिलीप जाधव एकमेकांचे चांगले मित्र होते. 1997 साली ग्रामपंचायत निवडणुकीत अकरा पैकी तीन जागा अशोक पाटील व धनाजी जाधव (डी.जे.) गटाने जिंकल्या; पण दहशतीच्या जोरावर त्यांनी आणखीन चार सदस्य आपल्या बाजूने वळवून सरपंचपद मिळवले. दरम्यान, फर्निचर व्यवसायातील भागिदारी आणि राजकीय वर्चस्वातून दिनकर पोवार व पांडुरंग पोवार या भावांचे चार महिन्यांच्या अंतराने खून झाले. त्यात अशोक पाटीलसह दिलीप जाधव, शफीक यांच्यासह नऊ आरोपी होते. सबळ पुराव्यांअभावी यातून संशयित सुटले आणि यानंतरच अशोक पाटील याचे वजन आणखी वाढले.

जीवाभावाची मैत्री ते पक्के वैरी

पाचगावात राजकीय वर्चस्वातून झालेल्या पोवार बंधूंच्या खुनांच्या आरोपातून अशोक पाटील व डी. जे. सुटले; पण अटकेत असताना दोघांत आर्थिक कारणावरून वाद झाले होते. या कारणावरून दोघे वेगळे झाले. 2010 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोघांनी धनंजय महाडिक यांचा एकत्रित प्रचार केला. मात्र, यानंतर दोघांतील खुन्नस वाढत गेल्याने दोघेही एकमेकांचे शत्रू बनले. ऑक्टोबर 2012 मध्ये पाचगाव ग्रामपंचयात निवडणुकीत अशोक पाटील याने स्वतंत्र पॅनेल केले. विरोधात जाऊन दिलीप जाधव सतेज पाटील गटाला मिळाला. या संघर्षातून दिलीप जाधव याच्यावर 2012 मध्ये प्राणघातक हल्ला झाला. त्यातून बचावल्यानंतर डी. जे. अज्ञातवासात गेला. 

अशोक पाटीलचा भरदिवसा ‘गेम’

दिलीप जाधव (डी.जे.) अशोक पाटीलच्या पाळतीवर होता. 13 फेबु्रवारी 2013 रोजी म्हाडा कॉलनीतील महाप्रसाद वाटपानंतर अशोक पाटील न्यू महाद्वार रोडवरील अ‍ॅक्सिस बँकेसमोर आला. दुपारी दोनच्या सुमारास बँकेच्या दारातील टपरीजवळ अशोक पाटील थांबलेला असताना तीन मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी अशोक पाटीलवर जवळून गोळ्या झाडल्या. जवळून गोळ्या झाडण्यात आल्याने उपचारापूर्वीच अशोक पाटीलचा मृत्यू झाल्याचे सीपीआरमध्ये घोषित करण्यात आले.

सीपीआर आवारात पाटील समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे पहिल्यांदाच सीपीआरमध्ये येणारी प्रवेशद्वारे बंद करण्यात आली होती. समर्थकांची संख्या वाढत गेल्याने वातावरण तणावपूर्ण बनत गेले. माजी आमदार महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक देखील सीपीआरमध्ये आले. 

सीपीआरसमोर रास्ता रोको, दगडफेक 

अशोक पाटील याचा मृतदेह सीपीआरमध्ये आणण्यात आला होता. खून राजकीय वर्चस्वातून झाल्याने नेत्यांसह संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पाटील कुटुंबीयांनी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मध्यरात्रीपर्यंत पाटील समर्थक सीपीआरसमोरील रस्त्यावर ठिय्या मांडून होते. यावेळी संतप्त जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडही भिरकावले. दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत सीपीआरमधील वातावरण तणावपूर्ण होते.

बदला घेण्याची शपथ 

अशोक पाटील याचा मृतदेह सीपीआरच्या शवागारात असताना काही समर्थक मृतदेहाजवळ आले होते. त्यांच्या मृतदेहावर हात ठेवून याचा बदला घेऊ, अशी शपथ घेतली होती. यावेळी त्यांना आवरण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण ते कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. 

दिलीप जाधवसह चौघांना अटक

दिलीप जाधवने (डी.जे.) सुपारी देऊन खून केल्याच्या संशयावरून दिलीप जाधवसह त्याचा भाऊ अमोल अशोक जाधव (वय 29, रा. माळवाडी, पाचगाव), हरीश बाबुराव पाटील (38, टिटवे, राधानगरी), ओंकार विद्याधर सूर्यवंशी (23, रा. सिद्धनगर, निपाणी), महादेव ऊर्फ हेमंत मसगोंडा कलकुटगी (26, राजारामपुरी) यांना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती. सर्वांवर अशोक पाटील याच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला. संशयित आरोपी शिर्डीतून बेळगावकडे जाण्याच्या तयारीत असताना 16 फेबु्रवारी 2013 रोजी पोलिसांनी हरीश पाटीलला अटक केली होती. 

धनाजी गाडगीळचा निर्घृण खून

अशोक पाटीलच्या खुनातील मुख्य संशयित डी.जे. ऊर्फ दिलीप जाधवचा मेहुणा धनाजी तानाजी गाडगीळ (वय 35, महादेव गल्ली, पाचगाव) याचा 22 डिसेंबर 2013 रोजी निर्घृण खून करण्यात आला. पाचगावच्या प्रगतीनगर चौकात एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी धनाजी आला होता. यावेळी दहा ते बारा तरुणांनी गाडगीळवर हल्ला केला. तलवार, गुप्ती, जांबियाने सपासप वार करून खून झाला. तर या हल्ल्यात गाडगीळचा मित्र अमर बाबासाहेब बावडेकर (वय 27) जखमी झाला होता.

धनाजी बनला ‘टार्गेट’

फेबु्रवारी 2013 मध्ये अशोक पाटीलचा खून झाल्यानंतर डी.जे.सह चौघांना अटक झाली. डी.जे.ला न्यायालयीन प्रक्रियेत गाडगीळ मदत करत असल्याने तो अशोक पाटील समर्थकांच्या हिटलिस्टवर आल्याची चर्चा होती. यातूनच पाटील गटाच्या तरुणांनी धनाजीवर हल्ला केला. डोक्यात तलवारीचा वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच जाधव गटाच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. 

मिलिंद पाटीलसह 6 जणांना अटक

धनाजी गाडगीळच्या खुनाच्या गुन्ह्यात अशोक पाटीलची मुले मिलिंद अशोक पाटील (वय 30) महेश अशोक पाटील (वय 23), यांच्यासह अक्षय जयसिंग कोंडेकर (वय 19, पाचगाव), प्रमोद कृष्णा आरेकर (28), निशांत ऊर्फ मुन्ना नंदकुमार माने (25), गणेश विलास कलकुटगी (26) या पाच जणांना अटक झाली होती. तर धनंजय महाडिक युवाशक्तीच्या काही पदाधिकार्‍यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.


सीआयडीने खोदली पाळेमुळे

अशोक पाटील खुनाचा प्राथमिक तपास जुना राजवाडा पोलिसांनी केल्यानंतर तो सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. राज्य गुन्हा अन्वेषण शाखेच्या पुणे कार्यालयातून आदेश मिळताच कोल्हापूर परीक्षेत्राचे अधीक्षक एस. व्ही. शेलार यांनी कागदपत्रे ताब्यात घेतली होती. तसेच याप्रकरणी सांगलीच्या शस्त्र तस्कराकडेही चौकशी करण्यात आली होती. 

फर्निचर कारागीर ते ‘साहेब’...

कोल्हापूर महापालिकेत पाणीपुरवठा विभागात पाणी सोडण्याचे काम करणारे मारुती पाटील यांना धोंडिराव व अशोक अशी दोन मुले. धोंडिराम वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरीस लागला. तर धाकटा अशोक फर्निचरचे काम करू लागला. बोलण्यात पटाईत असणार्‍या अशोकने लवकरच जमीन खरेदी-विक्री व्यवसायात पदार्पण केले. यातच गावच्या राजकारणात पडल्याने त्याने ‘साहेब‘ अशी ओळख निर्माण केली. 

डी.जे.चा मित्र व सख्खा मेहुणा धनाजी

धनाजी गाडगीळ हा डी. जे.चा सख्खा मेहुणा होता. तो पूर्वी सेंट्रिंग काम करत होता. पुढे महापालिकेत वडिलांच्या जागी नोकरीवर रूजू झाला. महावीर गार्डनमध्ये तो कामाला होता. डी. जे. आणि धनाजी पूर्वीपासून मित्र होते. त्यातून धनाजीच्या बहिणीशी डी.जे.चा विवाह झाल्याने दोघे मेहुणे बनले. 

Tags : Kolhapur, Murder, caused, political, dominance