Wed, Mar 20, 2019 22:54होमपेज › Kolhapur › निधीसाठी पालकमंत्र्यांच्या दारात भीक मांगो आंदोलन

निधीसाठी पालकमंत्र्यांच्या दारात भीक मांगो आंदोलन

Published On: Mar 20 2018 1:48AM | Last Updated: Mar 20 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीतील निधी लोकसंख्येनुसार महापालिकेच्या हक्‍काचा आहे. तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यातील 50 टक्क्यांहून जास्त निधी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील आमदारांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका अधिकार्‍यांना दिले आहेत; अन्यथा महापालिका प्रशासनाचा निधीचा प्रस्ताव नामंजूर करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महापालिकेतील नगरसेवकांवर हा अन्याय आहे. त्यामुळे निधीसाठी प्रसंगी पालकमंत्री पाटील यांच्या दारात भीक मांगो आंदोलन करू, असा इशारा काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी सोमवारी महासभेत दिला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या. 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) अंतर्गत 2017-18 या आर्थिक वर्षातील मंजूर 2 कोटी 94 लाखांच्या प्रस्तूत कामांना मंजुरी मिळावी. नागरी दलितेतर सुधार योजना 2017-18 या आर्थिक वर्षातील 1 कोटी 25 लाखांच्या कामांना मंजुरी मिळावी, असे दोन प्रस्ताव शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी महासभेपुढे मंजुरीसाठी सादर केले होते. त्यावरून महासभेत प्रचंड गोंधळ झाला. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडून जाणीवपूर्वक निधी कापला जात असल्याचा आरोप करण्यात आला. 

देशमुख यांनी पालकमंत्री पाटील यांच्या आदेशानेच महापालिका प्रशासनाने निधी वाटपात अन्याय केल्याचा आरोप करत सरनोबत यांना धारेवर धरले. निधी वाटपाचा तुम्हाला कुणी अधिकार दिला? असा जाब विचारला. सुरुवातीला 5 लाख 60 असा निधी देण्यात येणार होता. नंतर तो निधी 5 लाख केला. आता तर फक्‍त 2 लाख निधी दिला जाणार असून हा अन्याय आहे. या दोन लाखांत नगरसेवकांनी काय विकासकामे करायची? हा निधीही फक्‍त 46 नगरसेवकाना दिला जाणार आहे. नगरसेवकांच्या हक्‍काचा तब्बल साडेतीन कोटी निधी वळविला असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. यावेळी सत्यजित कदम यांनी सर्वच नगरसेवकांना समान निधी देण्यात यावा, अशी सूचना मांडली. 
 

tags : Kolhapur,news,Municipal, servants, injustice, in Kolhapur, Municipality,