Thu, Aug 22, 2019 13:17होमपेज › Kolhapur › महापालिकेचा लिपिक लाचप्रकरणी जेरबंद

महापालिकेचा लिपिक लाचप्रकरणी जेरबंद

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 26 2018 12:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील चतुर्थश्रेणीतील कर्मचार्‍याकडूनच तीन हजार रुपयांची लाच घेताना महापालिकेच्या इस्टेट विभागातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. शामकुमार विजय कराळे (वय 44, रा. मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे.

कराळेविरुद्ध रात्री राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, आरोग्य विभागात झाडू कामगार म्हणून नोकरीला असलेल्या तक्रारदाराने निवासस्थान मिळण्यासाठी कार्यालयाकडे रीतसर अर्ज केला होता. लिपिक कराळे याने निवासस्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. रकमेची पूर्तता झाल्यास तत्काळ निवासस्थान उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले होते.

तक्रारदाराने यापूर्वीच कराळेला आठ हजार रुपये दिले असतानाही  त्याने आणखी तीन हजारांची मागणी केली होती. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या कर्मचार्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्याशी संपर्क साधून, तक्रार दाखल केली होती. छत्रपती शिवाजी मार्केट येथील इस्टेट विभागाच्या कार्यालयात सापळा रचून पथकाने कराळेला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात काही काळ खळबळ उडाली होती. रात्री उशिरा कराळे याच्या मंगळवार पेठेतील घराची पथकाने तपासणी केली.