Sat, Jul 20, 2019 21:18होमपेज › Kolhapur › पन्हाळ्याला मुख्याधिकार्‍यांची प्रतीक्षा

पन्हाळ्याला मुख्याधिकार्‍यांची प्रतीक्षा

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 12:23AM

बुकमार्क करा
पन्हाळा : राजू मुजावर

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेला गेले वर्षभर मुख्याधिकारी मिळेना? राज्य सरकार मुख्याधिकारी नियुक्‍त करेना अन् नगर नगरपरिषदेला कार्यालय प्रमुख असणारा मुख्याधिकारी  पदाचा अधिकारी  मिळेना, त्यामुळे विकासकामांसह नागरी सेवेचा बोजवारा उडाला आहे.
नगरपालिका  निवडणुकीनंरत येथील मुख्याधिकारी शाम गोसावी यांची बदली झाली. त्यांच्या रिक्‍त जागेवर एक अधिकारी विराजमान होण्यासाठी आले. मात्र, त्याचवेळी त्यांना तहसीलदार पदाची नेमणूक मिळाली व पुन्हा पन्हाळा पालिकेचे मुख्याधिकारीपद रिक्‍त राहिले. त्यामुळे या पदाचा अतिरिक्‍त कार्यभार वडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पाटील  यांच्याकडे सोपविला.

मुख्याधिकारी पाटील वडगावातच फाईली मागवून काम करीत असल्याचे समजते. काम घेऊन एक कर्मचारी वडगावला जातो, सह्या घेतो, सह्या झाल्या नाही तर पुन्हा दुसरा दिवस, मग तिसरा अशा प्रकारे पालिकेचा कारभार सुरू आहे. शासनाने मुख्याधिकारी का दिलेला नाही, याचे उत्तर कोणी देत नाही.

बांधकाम परवानगी, जन्म-मृत्यू नोंद, पन्हाळा विकासाच्या आराखड्याला मंजुरी, पन्हाळा पाणी योजनेचे काम, विकास कामांवर देखरेख, शासनाकडून नव्या कामांसाठी निधी आणणे, विकास कामात निर्माण झालेल्या समस्या सोडवणे, स्वच्छता व अन्य सार्वजनिक  कामांवर नियंत्रण  आदी बाबींचा फज्जा उडाला आहे. नगराध्यक्षा रूपाली धडेल व काही तत्पर नगरसेवकांमुळे पालिकेचा कारभार रडतखडत कसातरी सुरू आहे.  पालिकेतील काही प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत, काही प्रकरणांचा निकाल पालिकेच्या बाजूने लागला आहे; पण मुख्याधिकार्‍यांअभावी त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. काही ठेकेदारांनी ढिसाळ काम केले असून  लाखो रुपयांच्या  नुकसानीची  जबाबदारी  निश्‍चित  करण्याचे काम सुरू आहे.