Sun, Jul 21, 2019 08:13



होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून

Published On: Dec 13 2017 7:21PM | Last Updated: Dec 13 2017 7:21PM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी

येथील उजळाईवाडी विमातळावरून मुंबईसाठी विमानसेवा २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार व रविवारी ही सेवा उपलब्ध असेल. मुंबईहून कोल्हापुरला दुपारी सव्वा वाजता विमान निघून ते अडीच वाजता पोहोचेल आणि तेच विमान कोल्हापुरहून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी निघून चार वाजून चाळीस मिनिटांनी मुंबईत उतरेल. केंद्र शासनाच्या उडान योजनेतून ही सेवा उपलब्ध झाली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

एअर डेक्कन कंपनीने ही विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या तिकिट बुकिंगला गुरुवारी (२१ डिसेंबर) प्रारंभ होत आहे. विमान सेवा सुरू होत असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एयर डेक्कनच्या अधिकार्‍यांनी बुधवारी दिली असल्याचे खासदार संभजीराजे यांनी स्पष्ट केले. गेली सहा वर्षे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद होती. ही सेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. छोटी शहरे विमान सेवेने जोडण्याच्या केंद्र शासनाच्या उडाण योजनेची घोषणा झाल्यानंतर त्यात कोल्हापूरचा समावेश करण्यात आला. त्यानंतरही वाहतूक परवाना आणि मुंबई विमानतळावरील वेळापत्रक (स्लॉट) मिळण्यासाठी विलंब होत राहिला. त्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गणपती राजू यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांच्या आदेशानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरण व नागरी उड्डाण संचालनायलयाने ऑक्टोबरमध्ये उजळाईवाडी विमानतळाची संयुक्त पाहणी केली होती.

रखडलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेबाबत आपण मंत्री अशोक गणपती राजू यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले होते, असे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे. त्यानंतरच विमानतळ सुधारणा आणि सेवेबाबत गतीने हालचाली झाल्या असून त्यासाठी संभाजीराजे यांचे कोल्हापूरकरांच्या वतीने आभार मानल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.