Thu, Apr 25, 2019 13:26होमपेज › Kolhapur › कोल्हापूरला 23 शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

कोल्हापूरला 23 शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

Published On: Feb 13 2018 2:03AM | Last Updated: Feb 13 2018 1:46AMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. यामध्ये 2016-17 सालचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार कोल्हापूरच्या बिभीषण पाटील यांना जाहीर झाला आहे. यासोबत पुण्याच्या रमेश तावडे (2014-15) आणि अरुण दातार (2015-16) यांनाही जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रुपये 3 लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या तीन वर्षांचे एकूण 

195 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. क्रीडानगरी कोल्हापूरला सन 2014-17 या कालावधीसाठी एकूण 23 पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात एक जीवनगौरव, एक क्रीडा संघटक, तीन क्रीडा मार्गदर्शक आणि 18 खेळाडूंना विविध खेळांसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटर अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मीकी यांना थेट शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनाही उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना साहसी क्रीडा प्रकारासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ग्रँड मास्टर विदित गुजराथी यालाही पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 7 महासागर पार करत जागतिक विक्रम करणारा जलतरणपटू रोहन मोरे यालाही थेट पुरस्काराने गौरविण्यात येईल.    

कोल्हापूरला तब्बल 23 शिवछत्रपती पुरस्कार  

‘क्रीडानगरी’ या नावलौकीकाला साजेशी कामगिरी करत कोल्हापूरच्या खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम  ठेवला आहे. विविध क्रीडा स्पर्धांत यशस्वी कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. यामुळे याची दखल राज्य शासनाला घ्यावीच लागली. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर का होईना कोल्हापूरला तब्बल 23 शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाले आहेत. सोमवारी सायंकाळी मुंबईतून पुरस्कारांची घोषणा होताच कोल्हापुरात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी स्टेडियमवरील जिल्हा क्रीडा कार्यालयात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करून खेळाडू व त्यांच्या पालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. ठिकठिकाणी पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे डिजिटल फलकही लावण्यात आले.  

पारंपरिक कुस्तीबरोबरच नेमबाजी, जलतरण, वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, व्हॉलीबॉल, मैदानी खेळ, स्केटिंग, बुद्धिबळ या खेळांतील यशस्वी कामगिरी करणार्‍या खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शकांना या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दूरद‍ृष्टीने कोल्हापुरात क्रीडाक्षेत्राचा भक्‍कम पाया रोवला.

या भक्‍कम पायावरच यशाची शिखरे चढविण्याचे कार्य मधल्या काळातील खेळाडूंनी केले. आता या शिखरांवर यशाच्या पताका फडकविण्याचे कार्य नवोदित खेळाडू करत असल्याचे समाधान क्रीडाप्रेमींतून आवर्जुन व्यक्‍त केले जात आहे. सन 2014-15 सालापासून महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारे शिवछत्रपती पुरस्कार प्रलंबित होते. यामुळे यंदा शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार एकाचवेळी जाहीर केले. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावर 23 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचा एकाचवेळी वर्षाव झाला आहे. यामुळे क्रीडानगरीचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. पुरस्कार विजेते व त्यांची यशस्वी कारकीर्द अशी... 

बिभीषण पाटील   (प्रशिक्षक-मार्गदर्शक) :

भारत श्री : 1974, 75, 79, 80. मस्क्युलर मॅन ऑफ इंडिया महाराष्ट्र अंगराज : 1974, अधिकृत संघटनेचे पहिले मानकरी. सह्याद्री श्री, विदर्भ श्री, बंगळूर श्री, सॅमसन श्री, म्हैसूर श्री, अपोलो श्री, पुणे-कोल्हापूर श्री, कोल्हापूर केसरी, बेळगाव श्री, शिवाजी विद्यापीठ श्री अशे अनेक किताब त्यांनी पटकाविले आहेत. याची दखल घेऊन शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले. निवृत्तीनंतर क्रीडा संघटक व मार्गदर्शकाची जबाबदारी स्वीकारली. खेळाडू घडवतच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठीचे कार्य त्यांनी सुरू ठेवले. अपघातात एक पाय गमवावा लागला तरी त्यांनी हार मानली नाही. विविध स्पर्धांचे आयोजन करणे, गरीब खेळाडूंना विविध खेळांचे प्रशिक्षण देणे, शालेय मुले-महिलांना आणि दिव्यांग (अपंग) खेळाडूंना  प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे सात्तत्याने आयोजन करणे असे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, रस्सीखेच, मल्लखांब या खेळांत त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण केले. अल्पावधीत तब्बल 13 शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू घडविण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बिभीषण पाटील यांनी केली आहे. यात वर्षा पत्की, दया कावरे, दीपाली शिंदे, राजू सुतार, माधवी पाटील (सर्व वेटलिफ्टिंग), स्नेहांकिता वरुटे, शुभस्वा शिखरे, अमित निंबाळकर, शुक्‍ला बिडकर (सर्व पॉवर लिफ्टिंग), सुहास खामकर, संग्राम चौगले, विजय मोरे, अजिंक्य रेडेकर  (सर्व बॉडीबिल्डिंग) यांचा समावेश आहे. 

संभाजी वरुटे  (कुस्ती संघटक) : 

आरे (ता. करवीर) येथील संभाजी वरुटे यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. इयत्ता आठवीपासून कोल्हापुरातील मठ तालीम येथे कुस्तीचा सराव केला. 1968 ला राज्य स्पर्धा गाजविल्यानंतर 1969 ला केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. 1971 ते 73 दरम्यान शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करत आग्रा, इसार, म्हैसूर येथे सुवर्ण पदकांची कमाई केली. यामुळे 1973 च्या जागतिक विश्‍व विद्यापीठ स्पर्धेत स्थान मिळाले. मास्को (रशिया) येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी भारताला कांस्यपदक मिळवून दिले. 1976 ला कुस्तीतून निवृत्ती घेतल्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे विभागीय सचिव, जिल्हा तालीम संघाचे सचिव पदासह पंचगिरी सुरू ठेवली. 1986 पासून भोगावती साखर कारखान्यात क्रीडा अधिकारी म्हणून काम करत कुस्ती, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो या खेळांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 

चंद्रकांत चव्हाण  (कुस्ती मार्गदर्शक) : 
हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे 1 जून 1956 साली जन्म. विद्यामंदिर चोकाक, महात्मा गांधी विद्यालय रूकडी येथे शालेय शिक्षणानंतर कोल्हापुरातील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत कुस्तीची आवड जोपासली. 1974 ते 78 या कालावधीत शिवाजी विद्यापीठाकडून 84 व 110 किलो वजन गटात अ.भा. विद्यापीठ स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. 1979 ला पतियाळा येथे एनआयएस प्रशिक्षण द्वितीय श्रेणीने  पूर्ण केले. यानंतर निवृत्तीपर्यंत ठिकठिकाणी क्रीडा मार्गदशक व प्रशिक्षकाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. अनेक नामवंत कुस्तीपटूही त्यांनी घडविले.  

प्रदीप पाटील (पॉवर लिफ्टिंग मार्गदर्शक) : 

कुरूंदवाड येथील प्रदीप पाटील यांचे महाविद्यालयीन शिक्षण कॉमर्स कॉलेज कोल्हापूर येथे झाले. 1978 साली हर्क्युलस जीम अँड फिटनेस इन्स्टिट्यूट  जिम अँड फिटनेस इन्स्टिट्यूट व्यायामशाळेची स्थापना केली. यात आजअखेर 100 पेक्षा अधिक वेटलिफ्टिंगपटू निर्माण केले. 30 राष्ट्रीय, 8 आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंही त्यांनी घडविले आहेत. 1988 पासून जैन ठिबकमध्ये त्यांनी वितरक म्हणून कामास सुरुवात केली. नोकरी सांभाळत त्यांनी गेली 16 वर्षे खेळाडू घडविण्याचे व्रत अखंड जपले आहे. खेळाबरोबरच सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. इंटरनॅशनल सोसायटी ऑन स्पोर्टस अँड न्यूट्रीशियन इंग्लंड, स्वातंत्र्यसेनानी श्रीपाल आलासे अर्बन बँक, इंटरनॅशनल सुपरट्रेडिंग ग्रुप अमेरिका या संस्थात सभासद आहेत. राष्ट्रीय पंच म्हणूनही ते सक्रिय आहेत.  

अजित पाटील (नेमबाजी मार्गदर्शक) : 

कोल्हापुरातील साई कॉलनी आपटेनगर येथे राहाणार्‍या अजित रामचंद्र पाटील 1993 पासून ज्येष्ठ नेमबाजपटू जयसिंग कुसाळे व रमेश कुसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शूटिंग खेळाचे धडे घेतले. विविध स्पर्धा गाजविल्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या दुधाळी येथील छत्रपती संभाजी महाराज नेमबाजी प्रशिक्षण केंद्र व शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीत  प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. प्रतिकुल परिस्थित अनेक नामवंत खेळाडू त्यांनी घडविले. यात राही सरनोबत, नवनाथ फरताडे, संदीप तरटे, फुलचंद बांगर असे अनेक नामवंत खेळाडूंचा समावेश आहे. नेमबाजी खेळाच्या विकासासाठी आयोजित विविध उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. 

शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक असे : 

सन 2014-15 : क्रीडा मार्गदर्शक : चंद्रकांत पाटील (कुस्ती), प्रदीप पाटील (वेटलिफ्टिंग), अजित पाटील (शूटिंग). खेळाडू : मंदार दिवसे (जलतरण), विजय मोरे (बॉडीबिल्डिंग), ओंकार ओंतारी व गणेश माळी (वेटलिफ्टिंग). दिव्यांग खेळाडू : अनिल पोवार (व्हॉलीबॉल), नलिनी डवर (मैदानी खेळ). सन 2015-16 : संघटक-कार्यकर्ता : संभाजी वरुटे (कुस्ती). खेळाडू : सचिन पाटील (मैदानी), विक्रम इंगळे (स्केटिंग), रोहित हवालदार (जलतरण), अजिंक्य रेडेकर (बॉडीबिल्डिंग), कौतुक डाफळे (कुस्ती). सन 2016-17 :  जीवन गौरव : बिभीषण पाटील (वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, रस्सीखेच या खेळात अनेक खेळाडू घडविण्याबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठीचे कार्य). खेळाडू : स्वप्निल कुसाळे (नेमबाजी), ऋचा पुजारी (बुद्धिबळ), प्रिती इंगळे (स्केटिंग), विक्रम कुर्‍हाडे (कुस्ती), अमित निंबाळकर (पॉवर लिफ्टिंग). दिव्यांग खेळाडू : अभिषेक जाधव (जलतरण), शुक्‍ला बिडकर (पॉवर लिफ्टिंग).


शिवछत्रपती पुरस्कारप्राप्‍त खेळाडू विक्रम कुराडे (कुस्ती ) : 

नंदगाव (ता. करवीर) येथे विक्रम कृष्णात कुराडे यांचा 21 नोव्हेंबर  1994 रोजी जन्म झाला.जन्मभूमी नंदगाव आणि कर्मभूमी कुस्तीपंढरी कोल्हापूर होय. शहाजी महाविद्यालयात शिक्षण घेत त्याने कुस्ती या क्रीडा प्रकारात राज्यातच नव्हे तर देशात त्याने कोल्हापूरच्या नावाचा डंका वाजविला. सन 2016 मध्ये राष्ट्रकूल सिनिअर ग्रिको रोमन कुस्तीत रौप्य, सन 2018 सिनिअर आशियाई ग्रिको रोमन कुस्तीसाठी निवड, सन 2014 मध्ये जागतिक ज्युनिअर गिक्रो रोमन कुस्तीत 7 वा क्रमांक, थायलंड, उझबेकीस्तान येथील जागतिक स्पर्धेत त्याने सहभाग नोंदवला. 

विजय मोरे  (शरीरसौष्ठव)  : 

विजय मोरे याने  सन 2001 पासून बॉडि बिल्डिंगला सुरूवात केली. बावडेकर आखाड्यात कसून सराव केला. इचलकरंजीतील हर्क्युलस  स्पर्धेत तो प्रथम सहभागी होऊन उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. 2003 मध्ये तो बिभिषण पाटील व्यायामशाळेत दाखल झाला. सलग 6 वेळा ‘महाराष्ट्र श्री’ व 2 वेळा ‘भारत श्री’ स्पर्धेत त्याने यश संपादन केले. पश्‍चिम इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब त्याने पटकाविला. इंडिया बॅकिंग, कोल्हापूर ‘महापौर श्री’ देखील त्याने पटकाविला. बेस्ट म्युझिक पोझर म्हणून देखील त्याला ओळखतात. त्याला युवा गौरव, सिंधीया ट्रस्ट पुरस्कार, मर्दानी खेळ गौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू त्याच्या मार्गदर्शनाखाली घडले आहेत. 

गणेश माळी   (वेटलिफ्टिंग) : 

कुरूंदवाड (ता. शिरोळ)  येथे गणेश  चंद्रकांत माळीचा 14 मे 1993 रोजी जन्मला झाला.त्याने स्कॉटलंड व ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धेत सन 2014 मध्ये सुवर्ण तर सिनिअर नॅशनलमध्ये त्याने रौप्यपदक पटकाविले. सध्या तो एअर फोर्स स्टेशनमध्ये नोकरीस आहे.कुरूंदवाड येथील हर्क्युलस जीमचा तो खेळाडू आहे. 

ओंकार ओतारी (वेटलिफ्टिंग) : 

कुरूंदवाड (ता. शिरोळ) येथे ओंकार शेखर ओतारी यांचा 16 डिसेंबर 1987 रोजी जन्म झाला. त्याने राष्ट्रकूल स्पर्धेत रौप्य सन 2009, आशियाई स्पर्धेत सहभाग सन 2009, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण 2010, राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सन 2014 स्कॉटलॅड येथे कांस्यपदक  तर कझाकिस्तान येथील जागतिक स्पर्धेत त्याने सहभाग घेतला होता. अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धे रौप्य, सुवर्ण तर ज्युनिअर नॅशनल, सिनिअर नॅशनल स्पर्धेत रौप्य  व सुवर्ण पदकांची कमाई केली. 

सचिन पाटील (मैदानी खेळ)

पन्हाळ गडाच्या पायथ्याशी केखले (ता.पन्हाळा)  येथील सचिन बाजीराव पाटील याने  मैदानी खेळात ठसा उमठविला आहे. कोडोली हायस्कूल कोडोली व भाई शं.तु.पाटील कॉलेज येथे तोे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. धावणे, स्टीपल चेस, आदी स्पर्धेत त्याने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्यपदकांची कमाई केली आहे. दिल्ली, चेन्‍नई, लखनऊ, जलपायगुडी, गोवा, रशिया येथे देखील कोल्हापूरच्या मैदानी खेळाची छाप पाडली आहे. वर्ल्ड रेस क्रॉस कंट्री स्पर्धेत त्यांना डेन्मार्क येथे कांस्यपदक तर वर्ल्ड यू.एस.आय.सी.क्रॉस कंट्री स्पर्धेत रशिया येथे कांस्यपदक मिळाले. 

ऋचा पूजारी (बुद्धिबळ) : 

कोल्हापूरच्या ऋचा पुजारी हिने लहानपणापासूनच बुद्धिबळ या खेळात करिअर करण्याच्या उद्देशाने वाटचाल सुरु ठेवली. शाळा-महाविद्यालयातून राज्य-राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. सहावेळा जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. आशियाई स्पर्धेत 9, राष्ट्रकुल स्पर्धेत 4 पदकांची कमाई केली. राष्ट्रीय स्पर्धेत 12 पैकी 6 सुवर्णपदकांचा समावेश आहे. मानांकित राष्ट्रीय महिला चॅलेंजर्स  स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. राज्य स्पर्धेत 6 पदकांसह 15 पेक्षा अधिकवेळा परदेशात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. महिला आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविलेल्या ऋचाची यशस्वी कारकीर्द सात्तत्याने विकसीत होत आहे. 

स्वप्निल कुसाळे (नेमबाजी) : 

ज्येष्ठ नेमबाजपटू जयसिंग कुसाळे  यांचा वारसा जपत स्वप्निल कुसाळे याने या क्रीडाप्रकारात आपली वेगळी ओळख निर्माण केली. वडील रमेश कुसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजी या खेळात राज्य-राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धा गाजविल्या. 50 मी. प्रोन, 50 मी. थ्री पोझीशन व 10 मीटर एअर रायफल प्रकारात स्वप्नीलने यशस्वी कामगिरी राखली. कॉमन वेल्थ स्पर्धेत 50 मी. प्रोन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. 13 व्या एशियन चॅम्पीयन स्पर्धेत त्याने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. याशिवाय अनेक स्पर्धेत यशस्वी सहभाग 
नोंदविला. 

अमित निंबाळकर   (पॉवरलिफ्टिंग) : 

इंगळेनगर कोल्हापूर येथील अमित निंबाळकर याने पॉवर लिफ्टिंगच्या 120 किलोवरील वजन गटात यशस्वी कामगिरीत सात्तत्य राखले. 2013 च्या राष्ट्रीय ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत चार राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकांची कमाई कली. 2014-15 ला अ.भा. आंतरविद्यापीठ  स्पर्धेत सलग दोन सुवर्णपदके मिळविली. 2015 मध्ये राष्ट्रीय फेडरेशन कपमध्ये रौप्य तर  वरिष्ठ जागतिक स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. 

रोहित हवालदार (जलतरण) : 

राजेंद्रनगर कोल्हापूर येथील रोहित हवालदार याने जलतरण प्रकारात कोल्हापूरचा नावलौकी