Sun, Aug 25, 2019 03:38होमपेज › Kolhapur › व्यापार्‍याच्या हातात ‘गोकुळ’ राहण्यासाठीच मल्टिस्टेटचा घाट : सतेज पाटील

व्यापार्‍याच्या हातात ‘गोकुळ’ राहण्यासाठीच मल्टिस्टेटचा घाट : सतेज पाटील

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 10 2018 12:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) गेल्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांना आपण मेटाकुटीला आणले. येणारी निवडणूकही त्यांना जड जाईल. त्यामुळे व्यापार्‍याच्या हातातच संघ राहावा, यासाठीच तो मल्टिस्टेट करण्याचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप रविवारी आमदार सतेज पाटील यांनी केला. कर्नाटकातील दूध संकलनात संघाला कोट्यवधी रुपयांचा तोटा असताना, होत असलेल्या या निर्णयाला संस्थांनी ठरावाद्वारे विरोध करून, हे ठराव सहायक निबंधकांकडे (दुग्ध) पाठवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ‘गोकुळ’च्या 21 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत संघ मल्टिस्टेट करण्याचा ठराव विषयपत्रिकेवर आहे. त्याला विरोध करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. 

आ. पाटील म्हणाले, कर्नाटकातील दूध संकलनामुळे संघाला 2015-16 सालात 24 कोटी तोटा झाल्याचे अहवालात म्हटले आहे. हा तोटा वाढत गेल्याने त्यानंतरच्या दोन वर्षांत या विषयावरील लेखापरीक्षकांना अभिप्रायच लिहू दिले नाहीत.  जिल्ह्यातील स्वाभिमानी दूध उत्पादकांना हा संघ कुणाच्या ताब्यात द्यायचा ते ठरवू दे. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यात या निर्णयाच्या परिणामांची जनजागृती करा. 

माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, संघावर मर्यादित मक्‍तेदारी, वर्चस्व राहावे, या हेतूनेच हा निर्णय घेतला जात आहे. ज्या गोष्टी संघ व सभासदांच्या हिताविरोधात असतील, त्याला निर्भयपणे विरोध केला पाहिजे. यावेळी बाळासाहेब कुपेकर यांचेही भाषण झाले. स्वागत बाबासाहेब देवकर यांनी केले. बैठकीला  ज. प. सदस्य बजरंग पाटील, ‘कुंभी’चे संचालक किशोर पाटील  उपस्थित होते.

...तर जबाबदारी पोलिसांची 

सभेचे ठिकाण बदला म्हणून आम्ही यापूर्वीच पोलिस, जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. सर्वांना बसता येईल, अशी व्यवस्था नाही. त्यामुळे  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला पोलिस अधीक्षक जबाबदार राहतील, असा इशारा आ. पाटील यांनी दिला. 

संचालकांचे महत्त्व संपणार 

आज एका संचालकाच्या मागे 100-200 संस्था आहेत. म्हणून त्यांना मान आहे. कर्नाटकच्या संस्था सभासद झाल्यानंतर त्यांना आता मिळणारा सन्मान मिळणार नाही. म्हणून त्यांनीही या ठरावाला विरोध करावा. 

आ. पाटील व मुश्रीफ सभेला जाणार 

गेल्या सर्वसाधारण सभेला परदेशात असल्याने उपस्थित राहू शकलो नाही. यावेळी मी उपस्थित राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. आजरा कारखान्याचे संचालक सुजित देसाई यांनी या सभेला आ. मुश्रीफ हेही उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.