होमपेज › Kolhapur › चित्रपटांमध्ये स्वप्न नाही, वास्तव दाखवण्याचा प्रयत्न 

चित्रपटांमध्ये स्वप्न नाही, वास्तव दाखवण्याचा प्रयत्न 

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 15 2017 11:55PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

चित्रपटांमधून केवळ स्वप्न नाही तर समाजातील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी केले. कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

भावे म्हणाल्या, या महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात आल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भालजी पेंढारकर यांची प्रेरणा घेऊन अनेकांनी चित्रपट निर्मिती केली. भालजी पेंढारकर यांच्याकडून चित्रीकरणावेळी शिस्ती काय असते, याचे धडे मिळाले. लहानपणापासून वाचनाची आवड होती. त्यातून समाजातील वास्तव स्थितीची माहिती होत गेली. ही परिस्थिती सत्यात उतरवण्याचा विचार मनात सुरू झाला. पण यासाठी माध्यम कोणते असावे, याचा शोध सुरू झाला. त्यामुळे चित्रपट माध्यम हे योग्य वाटले, गरीब, श्रीमंत, साक्षर, निरक्षर असे सर्वत्र एकत्र बसून पाहू शकतील, असे हे माध्यम होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला जे सांगायचे होते ते चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता येत होते. 

चित्रपट बनवताना त्याचे तंत्र समजावून घेतले, समाजात जो परिणाम अभिप्रेत होता, त्यासाठी कलाकारांकडून केवळ अभिनय करून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर ती व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनयात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझे चित्रपट प्रभावी ठरले.  अनेकजण परदेशी चित्रपटांचे अनुकरण करून चित्रपट तयार करतात; पण मी माझ्या देशात, माझ्या गावात काय चालले आहे, याचा अभ्यास करून त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करते म्हणूनच या चित्रपटांना राष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आल्याचे भावे यांनी सांगितले.