Sun, May 26, 2019 11:00होमपेज › Kolhapur › प्रकल्प लादल्यास जनआंदोलन

प्रकल्प लादल्यास जनआंदोलन

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 06 2018 11:38PMकसबा बावडा : प्रतिनिधी

लाईन बाजार येथे होणारा जैव कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रदूषणात भर घालणारा आहे. नागरी वस्तीत लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून हा प्रकल्प उभारण्याचा घाट घालण्यात येत आहेे. आपला याला विरोध आहे. प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला, तर जनआंदोलन उभारू, असा इशारा माजी महापौर स्वाती यवलुजे यांनी दिला. उलपे हॉल कसबा बावडा येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणीत त्या बोलत होत्या. या प्रकल्पाबाबत आजअखेर एकूण 199 हरकती दाखल झाल्या आहेत.सकाळी साडेअकराच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीला तणाव वाढल्यानंतर सुनावणीचे अध्यक्ष शिंदे यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. यानंतर विकसक कंपनीच्या प्रतिनिधीने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे प्रकल्पाची माहिती दिली.

जनसुनावणीत बोलताना प्रभागाच्या नगरसेविका, तसेच माजी महापौर यवलुजे म्हणाल्या, सध्या तीन-चार प्रकल्प प्रदूषणाचा उच्चांक गाठत आहेत. सुरू असलेले प्रकल्प कधी बंद, तर कधी सुरू असतात. यातच आणखी भर टाकणारा नवा प्रकल्प कशासाठी? हा प्रकल्प आपल्या प्रभागात येतो, शिवाय आपण प्रकल्पापासून अवघ्या शंभर मीटरवर राहतो, जनहितार्थ आपला प्रकल्पाला विरोधच राहील.कोल्हापूर शहरातील दवाखाने, लॅबोरेटरीज्मधील कचरा प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया करून तो जाळला जातो. शहरातील डॉक्टरांची संघटना कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचाच या प्रकल्पाला विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, प्रकल्पाचे प्रेझेंटेशन संगनमताने तयार करून चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले आहे. नोटिफाईड इंडस्ट्रियल एरियात हा प्रकल्प राबविण्यात यावा. तो नागरी वस्तीपासून दूर असावा, असे स्पष्ट आदेश केंद्रीय कायद्यात आहेत. वायू प्रदूषणाने नागरी आरोग्य, जैवविविधता धोक्यात येणार आहे. पर्यावरण वाचविण्याची शपथ कालच ज्या पर्यावरण अधिकार्‍यांनी नागरिकांना दिली, त्यांनीही पर्यावरणाचे नियम पाळावेत.

ज्या विकसक कंपनीला कोल्हापुरात काम देण्याचे सुरू आहे. त्या कंपनीचे इचलकरंजीतील काम असमाधानकारक असल्याचा दाखला अ‍ॅड. बी. आर. चव्हाण यांनी दिला. ‘नेचर इन निड’ या जुन्या कंपनीबाबत सध्या प्रकल्प राबवू इच्छिणार्‍या कंपनीनेच तक्रार केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जुना प्रकल्प जर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नागरी वस्तीत असल्याने धोकादायक ठरवला असेल, तर त्याच जागेत नवा प्रकल्प कसा? मंडळाची भूमिका संशयास्पद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पर्यावरणाच्या कायद्याने होणारा प्रकल्प पर्यावरणाला घातक असल्याने आपला त्यास विरोध आहे.

कोल्हापूरचे लोक जागरूक आहेत म्हणूनच आंदोलन करतात. महानगरपालिका, प्रदूषण मंडळ आमच्यावर उंदरासारखे प्रयोग करत आहे. नागरी वस्तीत राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प आपण होऊ देणार नाही. प्रकल्पाचे प्रेझेंटेशन संगनमताने केले आहे. हा प्रकार म्हणजे परीक्षा देणार्‍यानेच पेपर सेट करण्यासारखा असल्याचे कॉ.सतीश कांबळे यांनी स्पष्ट केले. ठेकेदाराने अनेकांचे हात ओले केले आहेत, म्हणूनच नागरी वस्तीत हा प्रकल्प लादला जात असल्याचा आरोप प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी केला आहे. विकास कंपनीकडून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये अनेक चुकीच्या बाबी दाखविल्या आहेत. कचर्‍याचे इनर्ट मटेरियल टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मनपा कोणाच्या दबावामुळे ताबा घेत नाही असा सवाल त्यांनी केला.

प्रेझेंटेशनमध्ये 10 कि.मी. च्या परिघात कोणतेही ऐतिहासिक स्थळ येत नाही असे खोटे दाखविण्यात आले आहे. हॉस्पिटल्स, नागरीवस्ती बरोबर शाहू जन्मस्थळ, नवीन  राजवाडा एक कि.मी. परिसरात असल्याचे राहुल मगदूम यांनी स्पष्ट केले.सर्व प्रदूषण करणारे प्रकलप कसबा बावडा, लाईन बाजारातच का, इतर भाग का पेटलेत का? असा सवाल नगरसेविका माधुरी लाड यांनी केला. प्रदुषणामुळे अगोदरच नागरिक हैराण झाले आहेत. पुन्हा नवीन प्रकल्प बावड्यात नकोच असा इशारा नगरसेवक अशोक जाधव यांनी दिला. परिसरातील आयुष्यमान निम्म्यावर आल्याचे प्रा. तोडकर म्हणाले. संघर्षाला कारण ठरू नका असा इशारा लक्ष्मण गायकवाड यांनी दिला. प्रकल्प माथी मारलाच तर जनआंदोलन उभारु असा इशारा माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे यांनी दिला.यावेळी अ‍ॅड. पिरजादे, नगरसेवक मोहन सालपे, किसन पडवळे, संग्रामसिंह गायकवाड, बुरहान नायकवडी, सतीश वेटाळे, योगेश निकम, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

...त्या गावचा रस्ताच कशाला माहीत पाहिजे?

उपप्रादेशिक अधिकारी गायकवाड यांनी सुनावणीला सुरुवात करण्यास सांगितले. यानंतर विकसक कंपनी एस. एस. सर्व्हिसेस यांच्याकडून प्रस्तावाबाबत माहिती सांगण्यास सुरुवात झाली. यादरम्यान नागरी असंतोष वाढला आणि सर्व नागरिक व्यासपीठासमोर एकत्र आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर यांना, ज्या गावाला जायचेच नाही त्या गावचा रस्ता कशाला माहीत पाहिजे म्हणत रोष व्यक्‍त केला.