Thu, Aug 22, 2019 08:20होमपेज › Kolhapur › जलविद्युत केंद्र बंद करण्याच्या हालचाली

जलविद्युत केंद्र बंद करण्याच्या हालचाली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कौलव : राजेंद्र दा. पाटील

राज्यातील पहिले व देशातील दुसरे जलविद्युत निर्मिती केंद्र म्हणून ओळखले जाणारे राधानगरी येथील शाहूकालीन जलविद्युत निर्मिती केंद्र गुंडाळण्याच्या हालचाली सुरू आहेत. या केंद्रातील कर्मचार्‍यांना प्रतिनियुक्‍तीवर पाठवले असून, शाहू महाराजांच्या दूरद‍ृष्टीचे प्रतीक असलेले हे केंद्र बंद करण्याच्या हालचालींमुळे जनतेतून संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत.

राधानगरी धरणाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर 1952 साली राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र येथे उभारण्यात आले होते. या केंद्रात 1.2 मेगावॅट क्षमतेची चार जनित्रे कार्यरत आहेत. त्यापैकी तीन जनित्रे आजही सुस्थितीत सुरू आहेत. मात्र, या केंद्राच्या शेजारीच दहा वर्षांपूर्वी ‘बीओटी’ तत्त्वावर खासगी जलविद्युतनिर्मिती केंद्र सुरू केले आहे. तेव्हापासून जुन्या केंद्राला जलविद्युत निर्मितीसाठी पाणी सोडले जात नाही. केवळ पावसाळ्यातील अतिरिक्‍त पाण्यावरच वीजनिर्मिती केली जाते.  

राज्यात वीजनिर्मिती कंपनीच्या कार्यकक्षेत हे एकमेव जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. जलविद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या शिफारशीनुसार या केंद्राचे अस्तित्व संपुष्टात आणण्याच्या ठरावाला कंपनीने एप्रिल 2017 मध्ये मंजुरी दिली होती. दि. 15 नोव्हेंबरच्या आदेशानुसार या केंद्राकडील अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता वगळता अन्य पदे रद्द केल्याचे समजते. सध्या केंद्राकडे अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता व अन्य दोन कर्मचारीच ठेवले आहेत.

अन्य सहा कर्मचार्‍यांना काळम्मावाडी व तिलारी प्रकल्पाकडे प्रतिनियुक्‍तीवर पाठवले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे अस्तित्व संपुष्टात येणार, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी हे केंद्र शाहू स्मारक म्हणून सुरू ठेवावे, अशा आशयाचा ठराव ग्रामसभांतून केला होता. त्यावेळी पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हे केंद्र सुरू ठेवण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, हे आश्‍वासन ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’ ठरले आहे. हे केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने पुन्हा जनआंदोलन उभारले जाण्याची शक्यता आहे.