Sun, Aug 18, 2019 20:35होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिरातील पुजारी हटावसाठी आंदोलन

अंबाबाई मंदिरातील पुजारी हटावसाठी आंदोलन

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 12:53AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सोवळे नेसल्याशिवाय अंबाबाई मंदिरात देवीच्या चरणास स्पर्श करण्यासाठी परवानगी नाकारणारे पुजारी कोण असा सवाल करत, पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या धरतीवर कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरासाठी कायदा करावा, मंदिरातील पुजारी हटवावे, याबाबत हिवाळी अधिवेशनात निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. जर निर्णय झाला नाही तर पुजारी हटावसाठी जानेवारी महिन्यात श्रमिक मुक्ती दल आणि मित्र संघटनांच्या वतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

डॉ. पाटणकर म्हणाले, श्रमिक मुक्ती दल व मित्र संघटनांचे कार्यकर्ते शुक्रवारी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो होतो. आत गेल्यानंतर आपण देवीच्या चरणाचे दर्शन घेणार आहोत, तेव्हा समोरील अडथळा काढा, अशी मागणी तेथे असलेल्या पुजार्‍यांना केली. त्यातील एका पुजार्‍याने सोवळे नेसल्याशिवाय आत जाता येणार नाही, असे सांगून आम्हाला रोखले, तर दुसरा म्हणाला तुमच्याबरोबर अनेकजण आत जातील, गोंधळ उडेल. यावर प्रत्यक्ष देवाच्या चरणाला स्पर्श करणे यालाच आम्ही देवाचे दर्शन मानतो, मग तुम्ही त्यापासून रोखणारे कोण असा सवाल त्यांना विचारला. तरीही त्यांनी देवाच्या पायाला हात लावण्यास विरोध केला. 

यावेळी गेल अ‍ॅमवेट ऊर्फ शलाका पाटणकर, संपत देसाई, मनीषा देसाई, मारुती पाटील, प्रा. टी. एल. पाटील, नजीर चौगुले, पांडुरंग पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.