Tue, May 21, 2019 22:58होमपेज › Kolhapur › पंचतारांकितमधील कागद कारखान्याविरोधात आंदोलन

पंचतारांकितमधील कागद कारखान्याविरोधात आंदोलन

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:20AMपट्टणकोडोली : वार्ताहर

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथून जवळच असलेल्या कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कागद कंपन्या रासायनिक पाणी जवळच्या कॅनॉलमध्ये सोडतात. हे पाणी सरळ पट्टणकोडोली गावातील तांबड्या तळ्यात मिसळत असल्यामुळे नागरिकांच्या व पशुधनाच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याबाबतचे वृत्त गुरुवारी दै.‘पुढारी’ मधून प्रसिद्ध होताच पट्टणकोडोली शिवसेनेच्या वतीने या कंपनीसमोर मोठे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या रेट्यामुळे जिल्हा प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकार्‍यांनी या दोन्ही कंपन्यांच्या सांडपाण्याचे, गावातील तांबडे तळे व गावखणीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले.

या दोन पेपर कंपन्यांनी हे रसायन व केमिकलमिश्रित पाणी आपल्या कंपन्यांचे असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना लेखी पत्र दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सोमनाथ पेपर मिल आणि लकी स्टार पेपर मिल या दोन्ही कंपनींचे केमिकलयुक्‍त पाणी शेजारी असणार्‍या कॅनॉलमध्ये सोडले जात आहे. हेच पाणी पट्टणकोडोलीतील ताबडे तळे व तेथून शाहूकालीन गाव खणीमध्ये मिसळत आहे. सदर पाण्याचा वापर जनावरांना पिण्यासाठी व  इतर वापरासाठी वापरले जाते. त्यामुळे पट्टणकोडोली येथील पशुसंवर्धन तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचा पाझर लगतच्या शेतजमिनीत, विहिरीमध्ये होत आहे; त्यामुळे शेतजमिनीची प्रत खराब होत आहे.

यासंबंधी गुरुवारी शिवसेना शहर पट्टणकोडोली यांचे वतीने सदर कंपन्यांसमोर आंदोलन करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. याप्रसंगी संबंधित कंपन्यांचे मालक  अशोक चौगुले, अब्दुल्ला शेख यांनी सदरचे पाणी आमचेच आहे, असे मान्य करून परत पाणी सोडणार नाही, असे लेखी पत्र दिले आहे. याप्रसंगी  आपराज व मोरे  या जिल्हा प्रदूषण नियंत्रणच्या अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, शहरप्रमुख आण्णासो जाधव, अरुण माळी, सरदार सूर्यवंशी,  युवा सेना अधिकारी अवधूत किर्तीकर, उपशहरप्रमुख नाना मोठे आदींसह शिवसैनिक उपस्थित  होते.