होमपेज › Kolhapur › खंडपीठासाठी पुन्हा रणशिंग

खंडपीठासाठी पुन्हा रणशिंग

Published On: Jan 12 2019 1:46AM | Last Updated: Jan 12 2019 1:46AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

35 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर खंडपीठ मागणीसाठी जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शुक्रवारी आंदोलनाचे पुन्हा रणशिंग फुंकण्यात आले. खंडपीठाबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास 17 जानेवारी रोजी वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा, रविवार दि. 27 पासून जिल्ह्यात न्यायालयीन कामकाजाला बेमुदत असहकार, बुधवार दि. 30 पर्यंत ठोस निर्णय न झाल्यास, जिल्हा कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी वकिली सनद परत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला.

कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र देण्यास होत असलेल्या विलंबाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बार असोसिएशनमार्फत कसबा बावडा येथील न्यायसंकुलातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांच्या उपस्थितीत ही सभा झाली.

कोल्हापूर खंडपीठासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत तीन दशकांपासून आंदोलनाचा अविरत लढा सुरू असतानाही शासनाने तोंडाला पाने पुसण्याशिवाय काही केले नाही, अशी टीकाही वकिलांनी केली. विद्यमान सरकारने याप्रश्‍नी कोल्हापूरकरांना सतत झुलवत ठेवण्याचा उद्योग चालविला आहे, असाही आरोप बैठकीत करण्यात आला.

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, कोल्हापूर खंडपीठासाठी सहा जिल्ह्यांत वकिलांच्या तीन पिढ्यांचा संघर्ष सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य न्यायाधीशांना पत्र सादर केले; मात्र मंत्रिमंडळ बैठकीतील ठरावासाठी घोडे अडले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आजवर पाच वेळा चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दोन दिवसांत पत्र देण्याचे त्यांनी मान्य केले. 20-25 दिवस होऊनही मुख्य न्यायाधीशांना पत्र उपलब्ध झाले नाही. आता संयम संपला आहे. आश्‍वासन देऊन सरकारकडून बोळवण केली जात आहे.

अ‍ॅड. अभिजित कापसे म्हणाले, खंडपीठासाठी जनचळवळीची पुन्हा गरज आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर विधानसभेची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे हा प्रश्‍न पुन्हा प्रलंबित पडण्याची भीती आहे.  अ‍ॅड. विजय महाजन म्हणाले, प्रसंगी वकिली सनद परत करण्याची तयारी ठेवा. अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, खंडपीठाच्या आंदोलनात पक्षकारांसह सर्वसामान्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. खंडपीठ कृती समिती, पक्षकार संघटनांनी पुढाकार घेऊन कोल्हापूरची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. अ‍ॅड. शिवाजीराव राणे म्हणाले, सहा जिल्ह्यांतील खासदार, आमदार, खंडपीठ कृती समिती यांचा संयुक्त मेळावा आयोजित करून, प्रश्‍नावर चर्चा घडवून आणावी. पत्र देतो, असे सांगून आजवर फसगत झाली आहे. अ‍ॅड. प्रकाश मोरे म्हणाले. खंडपीठ स्थापनेपासून कोल्हापूरला उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न आहे. लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चे काढून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू. अ‍ॅड. प्रताप जाधव म्हणाले, ‘आर या पार’च्या लढाईशिवाय पर्याय राहिला नाही. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील बांधवांचा संयुक्त मेळावा घेऊन, अखेरचा निर्णय घेण्याची गरज आहे. खंडपीठासाठी न्यायालयीन कामकाजापासून बेमुदत अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याशिवाय सरकार जागे होणार नाही.अ‍ॅड. रणजित गावडे म्हणाले, लोकभावनेचा विचार करून सरकारने पावले उचलणे गरजेचे होते. अ‍ॅड. पिराजी भावके म्हणाले, खंडपीठासाठी वकिलांसह समाजातील ज्येष्ठ मंडळी झटत असतानाही त्याची फिकीर नाही. कोल्हापूर जिल्ह्यात एक दिवसीय बंद पुकारण्यात यावा.

आता माघार नाही : अ‍ॅड. प्रशांत चिटणीस

बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, खंडपीठासाठी लोकलढ्याला 17 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी, दि. 16 जानेवारीला महापौर सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक होईल. शहर, जिल्ह्यात एक दिवसीय बंदचे आवाहन करण्यात येईल. दि. 27 जानेवारीपासून वकिलांचे जिल्ह्यात बेमुदत असहकार आंदोलन सुरू होईल. दि. 30 पर्यंत निर्णय न झाल्यास कार्यकारिणीतील सदस्य सनद परत करतील. कोणत्याही स्थितीत आता माघार घेतली जाणार नाही. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकिलांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे.यावेळी झालेल्या चर्चेत बार असोसिएशनचे लोकल ऑडिटर धैर्यशील पवार, जॉईंट सेक्रेटरी तेहजीज नदाफ, सेक्रेटरी सुशांत गुडाळकर, संजय मुळे सहभागी झाले होते. बैठकीला कार्यकारिणी सदस्य, वकील, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडहिंग्लज असोसिएशनचा आंदोलनाला पाठिंबा

कोल्हापूर खंडपीठप्रश्‍नी दि. 17 जानेवारीपासून जिल्ह्यात सुरू होणार्‍या आंदोलनाला गडहिंग्लज तालुका बार असोसिएशनने पाठिंबा जाहीर केला. तालुकाध्यक्ष सदाशिव गुरव, सागर पाटील यांनी पाठिंबा देणारे पत्र चिटणीस यांच्याकडे सुपूर्द केले.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांची समन्वयाची भूमिका कौतुकास्पद

दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची कोल्हापूर खंडपीठ आंदोलनातील भूमिका आजवरच्या लढाईत महत्त्वपूर्ण ठरली आहे. अगणित पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि आंदोलक यांच्यात समन्वय साधण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न गौरवास्पद आहे. खंडपीठासाठी भविष्यात होणार्‍या लढ्यात त्यांची भूमिका वकिलासह पक्षकारांना न्याय देणारी ठरणार आहे. निर्णायक टप्प्यातील लढ्यात डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मार्गदर्शन बळ देणारे ठरणार आहे, असे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी स्पष्ट केले.