Tue, Nov 20, 2018 17:29होमपेज › Kolhapur › पावसाची संततधार; मौनीसागर जलाशय भरला

पावसाची संततधार; मौनीसागर जलाशय भरला

Published On: Aug 16 2018 9:50AM | Last Updated: Aug 16 2018 9:50AMगारगोटी : प्रतिनिधी

भुदरगड तालुक्याची वरदायी समजला  जाणारा पाटगाव येथील मौनीसागर  जलाशय  आज पहाटे भरला. सांडव्यातून सुमारे ७४५ क्युसेकने पाणी विसर्ग होत आहे. या जलाशयातील पाण्याचा लाभ भुदरगड, कागल व कर्नाटकातील काही गावांतील शेतीला होतो.

भुदरगड तालुका सुजलाम सुफलाम करण्यामध्ये  मोलाचे योगदान असलेला पाटगाव येथील मौनीसागर जलाशय आज पहाटे ६ वा. सुमारास भरला. गतवर्षी ९ सप्टेंबरला जलाशय भरला होता. पाटगाव परिसरात गेल्या २४ तासात  १५४ मी मी इतका जोराचा पाऊस झाला आहे.  यावर्षी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मौनी सागर जलाशय परिसरात आज अखेर ४ हजार ३९४ मीमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आज अखेर ३ हजार ४०२ मीमी. पाऊस झाला होता. 

मौनीसागर जलाशय भरल्यामुळे जलाशयातील पाणी पातळी ६२६.६०० मीटर झाली आहे. जलाशयात १०५.२४२ दलघमी  (३.७२ टी. एम. सी.) पाणी साठा झाला आहे. याचा लाभ वेदगंगा नदीकाठा वरील १० हजार ८०० हेक्टर क्षेत्राला होणार आहे. या जलाशयाचे पाणी वेदगंगा नदीवरील भुदरगड तालुक्यातील पाटगाव, सुटल्याचीवाडी, वाण्याचीवाडी, तांबाळे, दासेवाडी, आनफ खुर्द, ममदापूर, करडवाडी, शेणगाव, आकुर्डे, म्हसवे, निळपण, वाघापूर या कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यात पाणी साचविले जात असल्यामुळे शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी वापर  होतो.