Fri, Jul 19, 2019 05:02होमपेज › Kolhapur › रूईत वळणाने घेतला युवकाचा बळी

रूईत वळणाने घेतला युवकाचा बळी

Published On: Apr 23 2018 1:51AM | Last Updated: Apr 22 2018 11:21PMरूई : वार्ताहर

मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात धीरज नरेंद्र सावर्डेकर (वय 18, रा. कागल) या महाविद्यालयीन युवकाचा अंत झाला. हा अपघात शनिवारी रात्री 11 वा.च्या सुमारास रूई-इंगळी मार्गावर घडला. याबाबतची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे. धीरज सावर्डेकर हा मूळचा वडणगेचा असून, सध्या तो कागल एमआयडीसीजवळ राहण्यास होता. इचलकरंजीतील एका महाविद्यालयात तो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण घेत होता. शनिवारी रात्री इचलकरंजीत नोटस्ची झेरॉक्स काढून व रूईत मित्राला सोडून तो कागलकडे जात होता. रूईपासून काही अंतरावरच अंधारात वाहनाचा अंदाज न आल्यामुळे तो रस्त्यावरून दहा फूट खाली कोसळला. यावेळी दगडावर त्याचे डोके जोरदारपणे आदळले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

अंधार असल्यामुळे आणि रस्त्याला दहा फुटांचा भराव असल्यामुळे धीरज खाली पडल्याचे वाहनधारकांच्या लक्षात आलेच नाही. रात्री उशिरापर्यंत नातेवाईक त्याच्या मोबाईलवर संपर्क साधत होते. मात्र, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे काही नातेवाइकांनी रूई येथील त्याच्या मित्राकडे विचारपूस केली. मात्र, रात्रीच तो रूईतून निघाल्याची माहिती समजली. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी परिसरातच त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. रविवारी पहाटेच्या सुमारास मोबाईलची रिंग रस्त्याच्या खालच्या बाजूस वाजत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नातेवाइकांनी रस्त्याच्या खाली जाऊन पाहिले असता धीरज मिळून आला. एक महिन्यापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.

Tags : Kolhapur, Motorcycle, collapses, Accident