Thu, Jul 18, 2019 16:29होमपेज › Kolhapur › टायर फुटल्याने मोटारीला अपघात; 9 जण जखमी

टायर फुटल्याने मोटारीला अपघात; 9 जण जखमी

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:42AMकोल्हापूर : प्रतिनिधी

रणरणत्या उष्म्याने तापलेल्या रस्त्यावर पुण्याच्या दिशेने भरधाव जाणार्‍या व्हॅनचा टायर फुटून झालेल्या दुर्घटनेत कर्नाटकातील एम. के. हुबळी (जि. बेळगाव) येथील नऊ जण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगळूर महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) येथील पूनम हॉटेलसमोर सोमवारी दुपारी ही घटना घडली. जखमींत तीन मुलांचाही समावेश आहे.जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टायर फुटल्याने व्हॅन महामार्गावर रस्ता दुभाजकावर जोरात आदळल्याने प्रवासी बाहेर फेकले गेले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महेश्‍वरी शेखर बडगेर (वय 28), राणी शिवांनद बडगेर (10), शशिकला चिदानंद बडगेर (28), विनायक श्रीशैल बडगेर (12), श्रीशैल चिदानंद बडगेर (45), शांताबाई इराप्पा बडगेर (60), संजू चिदानंद बडगेर (18), सुश्मिता बडगेर (6), द्राक्षायणी बडगेर (45, रा. एम. के. हुबळी, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. जखमींवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बडगेर कुटुंबीयांतील नऊ जण घरगुती समारंभासाठी व्हॅनने पुण्याकडे जात होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला व्हॅन टोप येथील हॉटेल पूनमजवळ आल्यानंतर टायर फुटला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने व्हॅन रस्ता दुभाजकावर जोरात आदळली.

दुर्घटनेत काही जण वाहनाबाहेर फेकले, तर काही लोक एकमेकांच्या अंगावर कोसळले. त्यात त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर इजा झाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. 108  क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

Tags : Kolhapur, Motor, accident, due, tire, cut, 9, people, injured