Wed, Jun 26, 2019 17:30होमपेज › Kolhapur › नवजात तिळ्यांच्या विरहाने मातेचाही मृत्यू

नवजात तिळ्यांच्या विरहाने मातेचाही मृत्यू

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 1:31AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

गौस कुटुंबाला तिळी मुले झाली. याची माहिती पै-पाहुण्यांना देण्यात आली. अपूर्ण वाढ झाल्याने नवजात शिशूंचा गुरुवारी मृत्यू झाला. मात्र, नवजात तिळ्यांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तमन्ना गौस तांबोळी (वय 25, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) या मातेचा शुक्रवारी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने लक्षतीर्थ वसाहत व कुंभोज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लक्षतीर्थ वसाहत येथे माहेर असलेल्या तमन्नाचा पाच वर्षांपूर्वी गौस यांच्याशी विवाह झाला. दोन दिवसांपूर्वी वेदना असह्य झाल्याने तमन्नाला रूईकर कॉलनीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी तिने तिळ्यांना जन्म दिला. यामध्ये दोन मुली आणि एक मुलगा होता. सायंकाळी या तिनही नवजात शिशूंचा मृत्यू झाला. 

रात्री उशिरा याची माहिती तमन्नाला देण्यात आली. त्यामुळे तमन्नाचा रक्तदाब वाढत गेला. पहाटे तिची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली. तीन मुलांच्या विरहाने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची शाहूपुरी पोलिसांत नोंद करण्यात आली.