होमपेज › Kolhapur › म्होरक्यासह साथीदार गजाआड

म्होरक्यासह साथीदार गजाआड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

मोरेवाडी, तामगाव (ता. करवीर) खूनप्रकरणी म्होरक्या भैरू ऊर्फ सुनील दगडू मोरे (वय 39, रा. मोरेवाडी) याच्यासह टोळीतील पाचही साथीदारांच्या पोलिसांनी गुरुवारी मुसक्या आवळल्या. जमीन, आर्थिक वादातून वेगवेगळ्या घटनांमध्ये टोळीने तामगावातील दोघांच्या अपहरणासह हत्या केल्याचे उघड झाले आहे. व्यावसायिक अजीज वजीर खुनात त्याच्याच सख्ख्या भावाचा सहभाग निष्पन्‍न झाल्याने त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

खून झालेल्या व्यक्‍तींच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मोरेवाडीतील विहिरीत सापडलेला मृतदेह अजीज सैफुद्दिन वजीर (वय 45), तामगाव खणीतील मृतदेह दस्तगीर महंमदहनिफ तद्देवाडी (37) या व्यक्‍तीचा असल्याचे निष्पन्‍न झाले आहे. संबंधित व्यक्‍तीचे तामगावमध्ये वास्तव्य होते, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.

भैरू ऊर्फ सुनील दगडू मोरे, रशीद सैफुद्दिन वजीर (43, गोकुळ शिरगाव), जावेद अमरबाबू शेख (49, तामगाव), सुनील पांडुरंग शिंदे (23, नेर्ली, ता. करवीर), रोहित एकनाथ पाटील (26, जयभीमनगर, गिरगाव) अशी पाच संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा समावेश असावा, असा संशय आहे. नावे निष्पन्‍न होताच संशयितांना अटक केली जाईल, असेही ते म्हणाले.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या भैरू मोरेसह साथीदारानी अत्यंत थंड डोक्याने कृत्य करून पुरावा नष्ट करण्यासाठी नियोजनबद्ध कट रचल्याचे उघड झाले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, एलसीबीचे निरीक्षक दिनकर मोहिते, युवराज खाडे व पोलिस कर्मचार्‍यांनी गेल्या पाच-सहा दिवसांपासून रात्रंदिवस मेहनत घेऊन गुन्ह्याचा छडा लावण्यात मोठी कामगिरी बजावली आहे, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. 

अजीज सैफुद्दिन वजीर सध्या तामगाव येथे कुटुंबीयासह राहत असले तरी ते मूळचे मिरजेतील आहेत. अजीज वजीर लेथमशिन व्यावसायिक होते. आठ वर्षे पत्नी, मुलासमवेत पुण्यात स्थायिक होते. वडिलांच्या निधनानंतर काही काळ मिरज व त्यानंतर तामगाव येथे कायमचे स्थायिक झाले. गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील वडिलार्जित सात गुंठे जमिनीवर शेड उभारून तेथे कारखाना सुरू केला.
अजीजचा भाऊ रशिद हा कामधंदा न करता सतत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या मित्रांच्या संगतीत होता. चैनीखोर स्वभावामुळे आई, भावाकडे सतत पैशाची मागणी करीत असे. भावाने त्याला पैसे देणे बंद केल्याने त्याने गोकुळ शिरगाव येथील वडिलार्जित जागेच्या विक्रीचा बेत पक्‍का केला. मात्र, अजीजसह पत्नीने जागा विक्री व्यवहाराला विरोध केला होता. त्यातूनच त्याचा खून करण्यात आला.  

घटनेनंतर म्होरक्याची पोलिस ठाण्यात ये-जा

मोरेवाडीतील खुनानंतर मारेकर्‍याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. सारा परिसर पालथा घालण्यात आला होता. चार हजार मोबाईल सीडीआर तपासण्यात आले. धागेदोरे लागत नव्हते. भैरू मोरेची करवीर पोलिस ठाण्यात ये-जा वाढली होती. तपासाधिकार्‍यांची भेट घेऊन वारंवार खुनाचे काय झाले? छडा लागला की नाही? तपास कुठवर आला आहे? याची विचारणा होत होती. दिलीप जाधव यांना शंका आली होती. तीन आठवड्यांपासून पाळत ठेवण्यात आली होती. साथीदाराचीही माहिती घेण्यात आली. अखेर तो पोलिस जाळ्यात अलगद सापडलाच!

 

Tags : kolhapur, kolhapur news, crime, Morewadi Tamgaon murder case, associates arrested,


  •