होमपेज › Kolhapur › निम्म्याहून अधिक शिक्षकांच्या होणार बदल्या

निम्म्याहून अधिक शिक्षकांच्या होणार बदल्या

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 12:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सात-आठ वर्षांपासून शिक्षकांच्या बंद असलेल्या प्रशासकीय बदल्या, गेल्यावर्षी शिक्षकांच्या बदलीला मिळालेली स्थगिती यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेतील नऊ हजारपैकी निम्म्यापेक्षा अधिक शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रथमच होत असलेल्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये बदली झालेल्या शिक्षकांची यादी आजही प्राप्‍त होऊ शकली नाही. चुकीच्या पद्धतीने बदली झाली तर कोल्हापुरातील काही शिक्षक संघटनांनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

मे महिना सुरू झाला की जिल्हा परिषदेत शिक्षक आणि कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होते. गेल्यावर्षी सुगम-दुर्गमच्या कारणावरून शिक्षकांच्या बदल्या गाजल्या होत्या. सुगम व दुर्गमचा अर्थ लावण्यातच इतका कालावधी गेला की त्यात शैक्षणिक वर्ष संपून गेले. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या अखेरपर्यंत झाल्याच नाहीत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला.सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांच्या याद्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मागविण्यात आल्या. बदलीसाठी शिक्षकांना वीस शाळांचे पर्याय ऑनलाईन अर्ज भरताना द्यावयाचे आहेत. त्यापैकी एका शाळेत संबंधित शिक्षकांची बदली करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या. 

यात काही त्रुटी आढळून आल्या, ते दूर करण्याचे प्रयत्न शासन करत आहेत. त्यामुळे अन्य जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या बदल्यांची यादी अद्याप प्रसिद्ध होऊ शकलेली नाही.आज बदली झालेल्या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेत येण्याची शक्यता होती. त्यामुळे शिक्षण विभागात शिक्षकांची वर्दळ वाढली होती. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ती येऊ शकली नाही. बदलीबाबत राज्यातील काही शिक्षक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली आहे. कोल्हापुरातीलही काही शिक्षक संघटना न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, यावेळी सरसकट बदलीच्या स्थगितीला नव्हे तर केवळ चुकीच्या बदलीच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सुगम मधील 6392 तर दुर्गम भागातील 286  असे एकूण 6678 शिक्षक बदलीस पात्र आहेत. तशी यादी जिल्हा परिषदेने शासनाला ऑनलाईनने सादर केली आहे. त्यामुळे बदलीच्या यादीकडे सर्व शिक्षकांचे लागून राहिले आहे.