Fri, Mar 22, 2019 22:54होमपेज › Kolhapur › मोरे आत्महत्या : संशयित अजूनही मोकाटच

मोरे आत्महत्या : संशयित अजूनही मोकाटच

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 27 2018 12:52AMकोल्हापूर : राजन वर्धन

कागल तालुक्यातील वंदूर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोरे यांनी शनिवार (दि. 18) रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. शाळेत होत असलेल्या बांधकाम रकमेतून खंडणी मागणार्‍या 5 जणांवर गुन्हा दाखल झाला. पण दहावा दिवस उजाडला तरी अजूनही हे संशयीत मोकाटच आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील रहिवासी असणारे विष्णू मोरे यांनी 4 ऑगस्ट 1984 ला चंदगड तालुक्यातील आलबादेवी या गावातून आपल्या शिक्षक सेवेला सुरुवात केली. पाच वर्षांनंतर त्यांनी कागलमधील व्हन्नूर,  बामणी, करनूर, रामकृष्णनगर व वंदूर येथे त्यांनी आपली सेवा बजावत प्रत्येक गावात मान मिळविला. वंदुरातील साडे चार वर्षांनंतरच्या सेवेनंतर ते गेल्या दीड वर्षापूर्वी पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून तेथेच रूजू झाले. ग्रामस्थांच्या मदतीने विविध स्पर्धा, उपक्रम राबवत शाळा डिजिटल केली. याशिवाय शालेय कामकाजातही त्यांचे ग्रामस्थांसह वरिष्ठांकडून अनेकदा कौतुक झाले होते.  

लोकप्रतीनिधी, प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने वंदूर शाळेच्या स्वच्छता गृहासाठी 1.75 लाखाचा निधी सन 2016 - 17  ला मंजूर झाला. या रक्कमेत मुलांमुलींसाठी प्रत्येकी तीन स्वच्छतागृहे बांधावयाची होती. पण एवढ्या कमी किमतीत कुणी करायचे यात अप्रत्यक्ष वाद लागला आणि परवडत नाही, असे म्हणून मुख्य असणार्‍या सर्वांनीच यातून बाजू काढली. त्यामुळे मुख्याध्यापकांसमोर प्रश्‍न निर्माण झाला आणि यातून शालेय व्यवस्थापन समितीच्या चर्चेतून अध्यक्षा आश्‍विनी पाटील यांचे पती मारुती पाटील यांनी या कामाची जबाबदारी घेतली. त्यानुसार कामही अंतिम टप्प्यात आल्यानंतर मंजूर निधीतील 85, 000 हजारांची रक्कम अदा करण्यात आली. 
पण याच रकमेत हे काम झाल्याचे समजून गावातील खंडणीबहाद्दरांनी मुख्याध्यापक मोरे यांना दर्जेदार काम न झाल्याचा ठपका ठेवून लाखाची रक्कम मागितली. शिवाय याबाबत जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रारही केली. त्यानुसार सर्वशिक्षा अभियानाचे कनिष्ठ अभियंता, लेखा समितीचे लेखनिक, विस्तार अधिकारी अशा तीन सदस्यांची समिती नेमून चौकशी करण्यात आली. चौकशीचा अंतिम अहवाल पूर्ण झाला नसतानाही संशयित आरोपींनी मोरेंना भीती घालून लाखाच्या रकमेची मागणी केली. 

मितभाषी मोरेंनी स्वतःच्या अब्रुला घाबरून काहीतरी मार्ग काढण्याची विनवणी केली. याप्रकरणाची गावातही चर्चा रंगली होती. पण वेळीच मिटवामिटवीस कोणीच पुढाकार घेतला नाही. तीन महिने सुरू असणार्‍या या वादाने मोरे अस्वस्थ असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

शनिवारी सकाळी गावातील प्रतिष्ठीत नेत्यांमार्फत हा वाद मिटविण्यात आला होता, त्यामध्ये तोडगाही निघाला होता. पण तरीही शाळा सुटल्यानंतर मोरे यांच्याकडे काहीजणांनी पैसे मागितल्याची चर्चा आहे. शिवाय त्यांनी याबाबत आपला पुतण्या विजयला याबाबतची कल्पना दिल्याचेही त्यांची पत्नी व मेहुणा यांनी पोलिसांना आपल्या जबाबात सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केलेले अमर आवळे, दयानंद कांबळे, अमर कांबळे, उत्तम कांबळे, दयानंद कांबळे व अनिल कांबळे यांचा शोध सुरू केला आहे.