Tue, Mar 26, 2019 21:52होमपेज › Kolhapur › मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Published On: Jun 03 2018 1:14AM | Last Updated: Jun 03 2018 1:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या काही भागासह शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागाला पावसाने झोडपून काढले, तर अनेक ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. सुमारे दोन तास शहर आणि परिसरात वातावरण पावसाळी झाले होते. हवेतील वाढलेला गारवा, अधूनमधून होणारे ढगाळ वातावरण यामुळे जिल्ह्यात मान्सूनची चाहूल लागली आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात पावसाळी बदल जाणवत आहेत. शनिवारी सकाळपासून वातावरण ढगाळ होते. दुपारी हवेतील उष्मा वाढला. काही काळ उकाड्याची तीव्रता जाणवत राहिली. मात्र, दुपारनंतर वातावरण पुन्हा ढगाळ झाले. सायंकाळी शहराच्या अनेक भागात पावसाला प्रारंभ झाला. मात्र, शहराच्या बहुतांशी भागात पावसाच्या तुरळक सरीच कोसळल्या. काही काळ काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.काही भागात रस्त्यावर पावसाचे पाणी साचले. सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली.

सुमारे दोन तास पाऊस सुरू होता. ढगाळ वातावरण, हवेत गारवा आणि कोसळणार्‍या सरीने शहरातील वातावरण पावसाळी झाले होते. अनेक जण छत्र्या, रेनकोट घेऊन घराबाहेर पडले होते. पावसाने शहरातील वाहतूकही काहीशी मंदावल्याचे चित्र होते. दरम्यान, जिल्ह्यात येत्या तीन-चार दिवसांत मान्सूनचे आगमन होईल, असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 4.59 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस भुदरगड तालुक्यात झाला. तिथे 14.80 मि.मी. पावसाची नोंद झाली. शाहूवाडीत 11 मि.मी.,गडहिंग्लजमध्ये 8, तर आजर्‍यात 7 मि.मी. पावसाची नोंद झाली.