Thu, May 28, 2020 10:38होमपेज › Kolhapur › सावकारीप्रकरणी गडहिंग्लजच्या माजी महिला नगराध्यक्षांवर गुन्हा

सावकारीप्रकरणी गडहिंग्लजच्या माजी महिला नगराध्यक्षांवर गुन्हा

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 21 2018 12:54AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

प्लम्बरला तीन लाख रुपये सावकारी कर्ज देऊन त्याबदल्यात नऊ लाखांची मागणी करीत अनधिकृतपणे घर ताब्यात घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा अरुणा रमेश शिंदे यांच्यासह पती रमेश भैरू शिंदे यांच्यावर पोलिसांत खासगी सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. फिर्यादी उदय शांताराम महाडिक (वय 51) हा मूळचा गिजवणे येथील आहे. 

त्याने रमेश शिंदे व अरुणा शिंदे यांच्याकडून 28 जून 2017 रोजी 3 लाख 5 हजार इतके सावकारी कर्ज घेतले होते. शिंदे यांच्याकडे सावकारीचे कोणतेही परवाने नसतानाही त्यांनी इतकी मोठी रक्‍कम महाडिक यांना दिली होती. या पैशाला दरमहा शेकडा पाच टक्के व्याजाच्या आकारणीबाबत दोघांमध्ये ठरले होते. त्याबाबतचे करारपत्रही दोघांमध्ये झाले होते. महाडिक याने वेळेत व्याज व मुद्दल याची रक्‍कम दिली नाही, म्हणून गिजवणे हद्दीतील त्याच्या मालकीच्या गट नं. 304 मध्ये मोकळी जागा 2 लाख 65 हजार रुपयाला खरेदी दिली होती.

या खरेदीपत्रावेळी महाडिक याने त्याच्या मालकीचे घर दिले नसताना शिंदे यांचा नातेवाईक स्टॅम्प रायटर भरत शिंदे याच्याशी संगनमत करून शिंदे पती-पत्नींनी साक्षीदारांना सोबत घेऊन महाडिक यांची जमीन व घर खरेदी केल्याचे दर्शविले. याशिवाय यापूर्वी व्याजापोटी 45 हजार रुपयांची रक्‍कमही महाडिक यांच्याकडून घेतली होती. 

यामध्ये गुन्हा दाखल झालेल्या अरुणा शिंदे या पालिकेच्या माजी नगराध्यक्षा असून त्यांनी अनेक वर्षे नगरसेविका म्हणूनही काम केले आहे. पती रमेश शिंदे यांनी गोडसाखर कारखान्याचे संचालक म्हणूनही काही वर्षे केले आहे. गडहिंग्लज शहरामध्ये राजकीय वलय असलेल्या शिंदे दाम्पत्याविरुद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस करीत आहेत.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Moneylender case, Gandhi Nagar president,