Sun, Aug 25, 2019 03:37होमपेज › Kolhapur › चाकूचा धाक दाखवून विनयभंग

चाकूचा धाक दाखवून विनयभंग

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 11 2018 1:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पोलिस रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराने घरात घुसून चाकूचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग केल्याची घटना दौलतनगर परिसरात रविवारी रात्री उशिरा घडली. संदीप ऊर्फ चिन्या अजित हळदकर (वय 19, रा. दौलतनगर) याला पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. तत्पूर्वी, संदीपने केलेल्या मारहाणीत गणेश मोहन जाधव (30, रा. डवरी वसाहत)  जखमी झाला.

गुन्हेगाराच्या दहशतीमुळे दौलतनगरसह परिसरात तणाव निर्माण झाला होता. पाठलाग करून पोलिसांनी संदीपला जेरबंद केले. खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी-मारामारीसह गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्डवर असलेल्या संदीपला दि. 10 एप्रिल 2018 मध्ये   जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते.

तडीपार आदेशाचे उल्लंघन करून संदीप रविवारी सायंकाळी दौलतनगर परिसरात आला. मद्यधुंद अवस्थेतील गुन्हेगाराने डवरी वसाहत येथील गणेश जाधव यांच्या घरावर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांना भरचौकात मारहाण केली. त्यानंतर रात्री उशिरा चाळीस वर्षीय महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवीत विनयभंगाचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड करताच मदतीला धावून आलेल्या वृद्ध सासूलाही त्याने  जोरात ढकलून दिले. सासू-सुनेला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर संदीपने भरचौकात थांबून हातात धारदार चाकू घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. नादाला लागल्यास एकेकाला बघून घेईन, अशी त्याने धमकीच दिली. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब कांबळे यांच्यासह  पथक घटनास्थळी दाखल झाले. संदीप पोलिसांना चकवा देत होता.  पहाटे त्याला अटक केली. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. संशयित चिन्या हळदकर  राजारामपुरी परिसरातील सराईत गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याने त्याच्याविरुद्ध ‘मोका’ कारवाईचा  प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल करण्यात येत आहे, असेही औदुंबर पाटील यांनी सांगितले.