होमपेज › Kolhapur › ती अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत

ती अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत

Published On: Dec 18 2017 2:33AM | Last Updated: Dec 18 2017 12:08AM

बुकमार्क करा

मोहटादेवी : सोमनाथ दातीर

घरची परिस्थिती बेताची. आपल्यावर आलेले वार्ईट दिवस मुलांवर येऊ नये म्हणून त्या माऊलीने काळजाचे पाणी करून, काबाडकष्ट करत मुलाला चांगले शिक्षण दिले. त्यातील एक इंजिनिअर झाला. महावितरणमध्ये जागा सुटल्या. त्याची परीक्षा दिली. तो उत्तीर्ण होऊन आता स्वतःच्या पायावर उभा राहिल आणि आपली म्हतारपणची काठी येईल, या सुखाच्या प्रतिक्षेत असलेल्या त्या माऊलीच्या पदरी मात्र निराशाच पडली. आपला कर्ता मुलगा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे गमावल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. इतके कमी की काय म्हणून सरकारी लालफितीचा कारभारही तिच्या नशिबी आला. उंबरठे  झिजवूनही अद्यापही तिला महावितरणकडून मदत मिळाली नाही.

त्याचे असे की, पाथर्डी तालुक्यातील मोहटा येथे गेल्या चार महिन्यांपूर्वी उच्चशिक्षित तरुण हरिदास सतुबा दहिफळे हा  महवितरणच्या हलगर्जीपणामुळे विजेचा झटका बसून मृत्यू पावला. हरिदास हा आपल्याच शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेला असता पोलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणा ही घटना घडल्याचा अहवाल उपकार्यकारी अभियंता यांनी दिला होता. सदर अपघाताच्या आर्थिक भरपाईची जबाबदारी ही  महावितरण कंपनीची राहिल,असा अभिप्राय त्यांनी दिला आहे.मात्र, अद्यापपर्यंत अजून कोणतीही मदत मिळालेली नाही, असे बबनबाई  दहिफळे यांनी सांगितले. 

 त्यांनी अनेक कार्यालयापर्यंत चकरा मारल्या मात्र कोणीही त्यांची दखल घ्यायला तयार नाही .ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मदतीच्या अर्जाद्वारे मागणी केली. त्यांच्या पत्राची वाट त्या अजून पाहात आहेत. अपघाती निधन झाले की लगेच मदत मिळते, मात्र चार महिने उलटूनही ही त्यांच्यापर्यंत काहीच आले नाही, असे त्या सांगतात. बबनबाई यांना दोन मुले आहेत. त्यांच्याकडे थोडी फार शेती आहे. हरिदास हा लहान मुलगा होता.एक मुलगा शेती करतो तर दुसरा मुलगा आपला नोकरीला लागला पाहिजे म्हणून बबनबाई यांनी कष्ट करून त्याला शिकवले. हरिदास याने इंजिनिअरिंग करून उच्चशिक्षण घेतले होते. महवितरणमध्येच परीक्षा देऊन जुनियर इंजिनिअरिंगची परीक्षा दिली होती.

यात उत्तीर्ण होण्याची खात्री होती.मात्र, ते नियतीला मान्य नव्हते. त्याच्यावर काळाने घाला घातला. नोकरीला लागून आईचे कष्ट थांबले पाहिजे, असे त्याचे स्वप्न होते. मात्र, ते अधुरे राहिले. ज्या खात्यात त्याला नोकरी कारायची संधी मिळणार होती, त्याच खात्याच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाचा  मृत्यू झाल्याने बबनबाई अत्यंत व्यथित होऊन सांगतात. पाथर्डी कार्यालय ते नगर, नाशिक, मुंबई व मंत्र्यापर्यंत मदत मिळण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, आपल्याला मदत कधी मिळणार याचे उत्तर अजूनही कोणी अधिकारी देऊ शकलेला नाही. बबनबाई यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. दगडमातीचे घर आहे, शेतीत मोलमजुरी करून त्या आपल्या कुटुंब चालवतात. शासनाची मदत कधी मिळेल असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर अजून कोणी ही देऊ शकले नाही. आता प्रतीक्षा फक्त मदतीची आहे. शासकीय खात्याला कधी जाग येते आणि मदत कधी मिळते याकडे तिचे डोळे लागले  आहेत.