होमपेज › Kolhapur › निर्जनस्थळी फिरते मोबाईल जुगारअड्डे 

निर्जनस्थळी फिरते मोबाईल जुगारअड्डे 

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 26 2018 11:21PMराशिवडे : प्रवीण ढोणे

शहरातील जुगारअड्डे प्रतिष्ठित जुगार्‍यांना असुरक्षित वाटू लागल्याने या जुगार्‍यांनी आता फिरत्या म्हणजेच मोबाईल जुगारअड्ड्यांचा आसरा घेतला आहे. गैबी (ता. राधानगरी) या नाक्यावरील जुगारअड्ड्यावर विशेष पोलिस पथकाने कारवाई करून राधानगरी पोलिसांना जागे केले असले, तरी जुगारी हुकमी ‘एक्के’, तर रक्षक ‘गुलाम’, अशी स्थिती आहे. 

राधानगरी तालुक्यातील अनेक खासगी फार्महाऊससह जंगलातील निर्जनस्थळी सुरू असणार्‍या मोबाईल जुगारअड्ड्यांचा शोध घेण्याचे आव्हान आता राधानगरी पोलिसांना फावल्या वेळेत पेलावे लागणार आहे.
मुळातच राधानगरी तालुका डोंगराळ आणि लांबपर्यंत पसरलेला. तशी तालुक्यातील लोकसंख्या सव्वा लाखाहून अधिक आणि गावांची संख्या 98 आहे. या तालुक्यामधील गावांच्या संरक्षणाची जबाबदारी पन्नास पोलिसांची. कोण पंढरपूर बंदोबस्ताला, तर कोण जोतिबा बंदोबस्ताला, कोण साहेब-मंत्र्यांच्या दौर्‍याकडे, तर कोण कोर्ट काम, वॉरंटकडे, उरलेल्यांनी नित्य कामे बघत तालुक्यातील शांतता-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे. कोकण, कर्नाटक, गोवा आदी वाहतूक याच रस्त्यावरून, त्यामुळे चोरटी मद्य वाहतूक, लाकुडचोरी आदी कामेही त्यातून फावल्या वेळेत बघायची. त्यातनं जर कारवाई केली, तर साहेबांची शाबासकी अन् जर नाही झाली तर शब्दांची उधळण. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यामध्ये मोबाईल (फिरता) जुगारअड्डे सुरू असल्याची चर्चा होती. जिल्ह्यातील नामवंत, प्रतिष्ठित जुगारी यामध्ये सहभागी होत असत. 

प्रामुख्याने चोरटी दारू, गुटखा, लाकुडचोरी आदी तपासण्या करून थकलेल्या राधानगरी पोलिसांना आता मोबाईल जुगारअड्डे यासह अन्य अवैध धंद्यांची पाळेमुळे शोधून काढण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.