Wed, Apr 24, 2019 01:52होमपेज › Kolhapur › वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या गैरवापराला बसणार चाप!

वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या गैरवापराला बसणार चाप!

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 19 2018 1:22AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

देशात वैद्यकीय प्रमाणपत्रांचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आचारसंहिता निर्माण केली आहे. यानुसार आता रुग्णाला वैद्यकीय प्रमाणपत्र देताना वैद्यकीय व्यावसायिकाला अत्यंत खबरदारी घ्यावी लागेल, अन्यथा हे प्रमाणपत्र न्यायालयात पुरावा म्हणून दाखल झाले तर त्याचा दोषही पत्करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. 

एखादी व्यक्‍ती आजारी असेल, त्याला विश्रांतीची गरज असेल तर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचे प्रमाणपत्र घेऊन त्याआधारे वैद्यकीय रजा मिळविण्याची नोकरीमध्ये सोय आहे. तथापि, आजारी नसतानाही असे प्रमाणपत्र घेऊन रजा उपभोगण्याचे वा गैरप्रकार होत असल्याचे अनेक प्रकार निदर्शनास येत असतात. परंतु, त्यावर आजपर्यंत कोणाचाही चाप नव्हता. वैद्यकीय प्रमाणपत्र सहज चालले तर रुग्ण आणि वैद्यकीय व्यावसायिक या दोघांतही आनंदी आनंद असे. तर संबंधित प्रमाणपत्र न्यायालयात पुरावा म्हणून दाखल झाले तर वैद्यकीय व्यावसायिक आपले हात वर करणे पसंत करीत होते. यामुळे कायदेशीर गुंतागुंतही निर्माण होत होती आणि प्रमाणपत्रांच्या गैरवापराला आणि पर्यायाने भ्रष्टाचारालाही मोठा वाव मिळत होता. ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने या प्रकाराला नुकताच चाप घातला आहे. 

‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ ने तयार केलेल्या आचारसंहितेनुसार आता कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाला रुग्णाला 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे प्रमाणपत्र देता येणार नाही. या कालावधीनंतरही जर रुग्णाला विश्रांतीची गरज असेल तर संबंधित रुग्णाला प्रत्यक्ष तपासल्याखेरीज मुदतवाढ देता येणार नाही. यासाठी रुग्णाची ओळख निश्‍चित करण्यासाठी फोटो आयडेंटी कार्ड तपासणेही अनिवार्य करण्यात आले आहे. 

सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार बर्‍याच वेळेला रुग्ण घरी आजारी आहे, असे सांगून त्यांचे कुटुंबीय वैद्यकीय व्यावसायिकाकडून प्रमाणपत्र मिळवित होते. असे प्रमाणपत्र देताना रुग्ण सोबत आणलेला नाही (झरींळशपीं छेीं र्इीेीसहीं) असा शेरा मारला जात असे. परंतु,  या पद्धतीलाही प्रतिबंध घालण्यात आला आहे. याखेरीज ज्या रोगाच्या उपचार पद्धतीविषयी ज्ञान अथवा प्रशिक्षण घेतलेले नाही, अशा रोगांविषयी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार वैद्यकीय व्यावसायिकांना असणार नाही. बाह्य रुग्ण विभागाच्या तारखेदिवशीच प्रमाणपत्रे देण्यात यावीत आणि मागील तारीख घालून प्रमाणपत्रेही देऊ नयेत, असे कौन्सिलने या आचारसंहितेत स्पष्ट केले आहे.

यापुढे प्रमाणपत्र देताना खबरदारी बाळगा 

वैद्यकीय प्रमाणपत्रे घेऊन सुट्टी उपभोगण्याबरोबरच त्याचा गुन्हेगारी विश्‍वामध्ये वापर करण्याची प्रथाही आता वाढीस लागली आहे. यामध्ये संबंधित व्यक्‍ती एखादी गुन्हेगारी कृत्य करते आणि नंतर न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर सुनावणीवेळी युक्‍तिवादात वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेतला जातो. हा पुरावा खटल्याचा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. तेथे एखाद्या गुन्हेगाराला प्रमाणपत्राच्या आधारे मोकळीक मिळण्याची शक्यता असते. काही वेळेला वैद्यकीय व्यावसायिक त्यातून पळ काढण्यासाठी हात वर करण्याचा प्रयत्न करतात. हे अनुभव लक्षात घेऊन ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने वैद्यकीय व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, यापुढे प्रमाणपत्र देताना खबरदारी बाळगा, अन्यथा न्यायालयातून परिणामांची शिक्षा भोगावी लागेल, असेही स्पष्ट केले आहे.