Tue, Jul 07, 2020 23:47होमपेज › Kolhapur › कोल्हापुरातून आठ वर्षांत तब्बल १००० नागरिक बेपत्ता

कोल्हापुरातून आठ वर्षांत १००० नागरिक बेपत्ता

Published On: Feb 12 2019 1:26AM | Last Updated: Feb 12 2019 1:26AM
कोल्हापूर : गौरव डोंगरे 

अभ्यासाचा ताण, घरच्यांचा लग्‍नाला विरोध, न पेलवणारे अपेक्षांचे ओझे, सावकारी कर्ज, अनैतिक संबंध, सासरच्यांकडून छळ, मनाविरुद्ध लग्‍न, मानसिक संतुलन बिघडणे, आजाराला कंटाळणे अशा विविध कारणांतून बेपत्ता होणार्‍या व्यक्‍तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

मागील आठ वर्षांत जिल्ह्यातून 1700 जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. यातील सुमारे 1 हजार व्यक्‍ती अद्याप मिळून आलेल्या नाहीत. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. 2011 ते 2018 या कालावधीत 1018 महिला, तर 628 पुरुष बेपत्ता झाल्याची नोंद  जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत झाली. पोलिस ठाणेस्तरावरील तपास तसेच काही जण स्वत:हून परतल्याचे समोर आले. हरवलेल्यांपैकी 416 महिला व 239 पुरुष मिळून आले; पण आजही 1 हजार जण बेपत्ताच आहेत. यामध्ये सुमारे 600 महिलांचा समावेश आहे.

बेपत्ता झाल्याची नोंद

व्यक्‍ती घरातून बेपत्ता झाल्यास त्याची नोंद 24 तासांनंतर पोलिस ठाण्यात होते. संबंधिताचे चार फोटो, वर्णन मिसिंग डायरीत नोंदविली जाते. याचा तपास हवालदार दर्जाच्या अधिकार्‍याकडे सोपविण्यात येतो. 

प्रेमवीरांमागे पोलिस यंत्रणा 

बेपत्ता होणार्‍यांमध्ये विवाहेच्छुकांची संख्या अधिक आहे. प्रेमविवाहाला घरच्यांकडून होणार्‍या विरोधामुळे अनेक जोडपी पळून जाऊन लग्‍न करतात. अशांच्या शोधासाठी सध्या मोबाईलची सीडीआर प्रणाली वापरात आणून शोध घेतला जातो; पण विवाह करणार्‍यांचे वय पूर्ण आहे किंवा नाही याची खातरजमा करून दोघांना पोलिस ठाण्यात आणून पालकांसमोर हजर केल्यानंतर शोधमोहीम थांबते. अनेकदा याबाबत मुलींच्या घरच्यांकडून गुन्हा दाखल करण्याचा दबाव पोलिसांवर येतो. 

...तर अपहरणाचा गुन्हा

18 वर्षे पूर्ण न झालेली अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास त्याबाबत केवळ बेपत्ता वर्दी न घेता अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. अशा अल्पवयीन मुलांच्या शोधाचा तपास अधिकार्‍याकडे दिला जातो. 

पैशाची अफरातफर

भिशी, हातउसणे पैसे, चैनी अशा कारणांतून पैसे घेतलेले अनेक जण जिल्ह्याबाहेर गेल्याचे समोर आले आहे. देणीदारांच्या घराकडे फेर्‍या वाढल्यानंतर थेट अनेकांनी घर सोडून पोबारा केला आहे. अशाही गुन्ह्यांचे प्रमाण मोठे आहे.

वृद्धांचा शोध सुरूच

वृद्धापकाळामुळे मानसिक संतुलन बिघडल्याने वयस्कर लोक घरातून निघून गेल्याच्या नोंदीही पोलिसांकडे आहेत. अशा व्यक्‍ती काहीही आठवत नसल्याने अनेकदा स्वत:चे नाव सांगू शकत नाहीत. अशा व्यक्‍ती जिल्ह्याबाहेरही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा लोकांचा शोध घेण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागत असल्याचे पोलिस कर्मचारी सांगतात.  मोर्चे, आंदोलने, बंदोबस्त, गंभीर गुन्ह्यांचे तपास यामुळे पोलिसांवर कामाचा ताण आहे. अशात बेपत्ता व्यक्‍तीचा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे पोलिस सांगतात. 

अपहरणाचे गुन्हे 

14 ते 18 वयोगट
वर्ष      मुले    मुली    एकूण
2014     19    42    61
2015    36    128    164
2016    34    145    179
2017    34    146    180
2018    17    109    126

अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक

14 ते 18 वयोगटातील मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्येही मुलींची संख्या जादा आहे. मागील पाच वर्षांत 512 मुली, तर 95 मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. प्रेमविवाह, हट्ट, मोबाईल, घरगुती वाद अशा वेगवेगळ्या कारणांनी ही मुले घराबाहेर पडल्याची कारणे समोर आली आहेत. अल्पवयीन मुलांना समजून घेण्याची मानसिकता पालकांमध्ये दिसून येत नाही. रागाच्या भरात मुलांना खडसावल्याने तसेच शिक्षणाबाबत अधिक दबाव टाकल्याने काही मुले कंटाळून घर सोडून निघून जातात. पालकांनी अशा वेळी मुलांशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे.