Tue, Sep 25, 2018 03:22होमपेज › Kolhapur › गौण खनिज अवैध उत्खनन, वाहतूक रोखा

गौण खनिज अवैध उत्खनन, वाहतूक रोखा

Published On: Jul 28 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 11:30PMकोल्हापूर : अनिल देशमुख

गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन आणि वाहतूक होत असते, त्यामुळे पर्यावरणाचा तर र्‍हास होतोच, पण शासनाचा महसूल बुडतो. यामुळे हे उत्खनन, वाहतूक रोखण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. याकरिता तालुकास्तरावर दक्षता पथके स्थापन करा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाला दगड, वीट, माती, मुरूम, वाळू आदी गौण खनिजातून रॉयल्टी म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत असतो. यावर्षी राज्य शासनाने गौण खनिजातून रॉयल्टी म्हणून 2 हजार 400 कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी 40 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

गौण खनिजातून शासनाला मिळणारा महसूल आणि प्रत्यक्ष होणारे उत्खनन यात बरीच तफावत आहे. स्थानिक यंत्रणेला हाताशी धरून गौण खनिजाची राजरोस लूट सुरूच आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने गौण खनिजाच्या अवैध उत्खननाला आळा घालण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. 

उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी वारंवार भेटी द्या, तांत्रिकदृष्ट्या मोजणी करा, त्याचे अहवाल सादर करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावर दक्षता पथक स्थापन करा, या पथकाच्या कामकाजाच्या नोंदी वहीत ठेवा आणि दर महिन्याला त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करा, असेही आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

दक्षता पथके कागदावरच राहण्याची शक्यता

तालुकास्तराव दक्षता पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अनेक तहसील कार्यालयात दैनंदिन कामकाजासाठी उपलब्ध मनुष्यबळ कमी पडते. सुमारे 30 टक्के जागा रिक्त आहेत, त्यात या पथकांसाठी वाहन, इंधन आदींची तरतूद कशातून करायची हा प्रश्‍न आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर दक्षता पथके स्थापन झाली तरी त्यांचे कागदावरच अस्तित्व जास्त राहण्याची शक्यता आहे.