होमपेज › Kolhapur › मुलांमधील वाढती खुन्‍नस जीवघेणी

मुलांमधील वाढती खुन्‍नस जीवघेणी

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 11 2018 11:50PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : गौरव डोंगरे

शाळकरी मुलांच्या बदलत्या राहणीमान आणि चिडचिडेपणाने पालकांची चिंता वाढविली आहे. बुधवारी रात्री आश्रमशाळेतील मुलांनी मारहाण करत सहकार्‍याचा जीव घेतला. काही दिवसांपूर्वी 14 वर्षीय मुलाने इस्टेटीच्या वादातून चुलत आजीवर पिस्तुल रोखले. किरकोळ वादातून शिवाजी पेठेत 19 वर्षीय मुलाचा त्याच्याच वयाच्या मुलांनी खून केला. गुन्हेगारीतील अल्पवयीन मुलांचा सहभाग पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. 

नोकरदार पालकांचे आपल्या मुलांवर लक्ष राहावे, यासाठी खटाटोप सुरू असतात. यासाठी मुलाची माहिती ठेवण्यासाठी त्याला मोबाईल पुरविला जातो. आता मुलेही केवळ संपर्क साधन म्हणून मोबाईलचा वापर करत नाहीत तर त्यांना अ‍ॅन्ड्राईड फोन लागतात. मुलांच्या हट्टापायी पालक असे मोबाईल पुरवितात; पण त्याला इंटरनेटची जोड मिळताच मुले एका भ्रामंक जगात वावरू लागतात. सोशल मीडियाच्या प्रभावाने अनेक मुले गुन्हेगारीकडे वळल्याचे विदारक चित्र आज समाजात दिसत आहे. शाळकरी मुलांवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव जाणवत आहे. सातवी- आठवीपासूनच्या मुलांकडे आता पालकांनीच मल्टिमीडिया मोबाईल सोपवले. गेम्स, पोर्न साईटस्, जागतिक घडामोडी, गुन्हेगारी, सिगारेट, दारूच्या जाहिराती अशांचा मुलांवर परिणाम होत आहे. 

गुन्हेगारीकडे वळलेल्या अनेक अल्पवयीन मुलांनाही त्यांनी केलेले गुन्हे असेच किरकोळ वाटतात. वर्चस्ववादातून कोल्हापुरातील शिवाजी पेठेत दोघांनी एका 19 वर्षीय मुलाचा चाकूने भोसकून खून केला. संशयितांपैकी एक नामवंत फुटबॉलपटू होता. दोन आठवड्यांपूर्वी नागाळा पार्कात मालमत्तेच्या वादातून झालेल्या भांडणात एका 14 वर्षीय मुलाने नातेवाईकांवरच पिस्तुल रोखल्याचे समोर आले. या घटनांनी पालक हादरून गेले आहेत. 

खुन्‍नस चिंताजनक

लहान मुलांतील वाढती खुन्‍नस खरोखर चिंताजनक बनली आहे. पालकांनी हट्ट पुरविले नाहीत तर विषारी औषध सेवन करणे, घरातून निघून जाण्याची धमकी देणे, उपाशी राहणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे अशा क्‍लुप्‍ता मुलांकडून लढविल्या जातात. पालकांनी यावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे आहे. 
जीवघेणे गेम्स

ब्लू व्हेल गेमसारख्या जीवघेण्या ऑनलाईन गेमने जगाला धक्‍का दिला. जगभरातील अनेक मुले या खेळाला बळी पडली. साध्या अटींची पूर्तता ते आत्महत्या असा या ब्लू व्हेल गेमचा प्रवास थरारक आहे. यासह अनेक गेम्समुळे मुले चिडचिडी बनून स्वत:ही एका अभासी जगात जगत 
आहेत.