Wed, Mar 20, 2019 02:56होमपेज › Kolhapur › मिनी वृंदावन बनले चराऊ कुरण

मिनी वृंदावन बनले चराऊ कुरण

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 23 2017 12:26AM

बुकमार्क करा

काळम्मावाडी : अंकुश पाटील

दूधगंगानगर (ता. राधानगरी) येथील राजर्षी शाहू सागराच्या पायथ्याशी असलेल्या ‘मिनी वृंदावन’ बागेला गत वैभव मिळणार का? असा सवाल पर्यटक व स्थानिक जनतेतून विचारला जात आहे. या बागेच्या विकासाकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाने दुर्लक्ष केले आहे. वृंदावनास अवकळा प्राप्त झाली आहे. 

वृंदावन गार्डनची प्रतिकृती म्हणून काळम्मावाडी येथे 46 हजार 800 चौ. मी. क्षेत्रफळावर बगीच्या तयार केला होता. या बागेमध्ये विविध रंगांची फुले, झोपाळे, वनऔषधी, मर्क्युरी दिवे, स्विमिंग टँक आदी सुविधा उपलब्ध होत्या. यामुळे काळम्मावाडी प्रकल्पास मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत होते. जवळपास 2006 पासून वृंदावनाच्या वैभवास अवकळा प्राप्त होऊ लागली. आज हे वृंदावन मोकाट जनावरांचे कुरण बनले आहे. बगीचा जेंव्हा सुस्थितीत होता तेंव्हा वर्षाकाठी 5 ते 6 लाखांच्या आसपास महसूल जमा होत होता. पण सध्या बागेची दुर्दशा झाली असून पर्यटकांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरवली आहे.

बगीचा पाहण्यास खुला झाल्यापासून लाखात महसूल मिळवून देणार्‍या या उद्यानाकडे संबंधित खात्याने कानाडोळा केला आहे. 25.40 टी. एम. सी. पाणीसाठा असणार्‍या अथांग सागरा शेजारील बागेला पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे वृंदावन बागेचे गवत बागेत रूपांतर झाले. 

राधानगरी तालुका निसर्गाच्या कुशीत विसावला असून येथे राजर्षी धरण, दाजीपूर अभयारण्य, इदरगंज पठार, हसणे बंधारा, गायकडा धबधबा, राऊतवाडी, धबधबा, तुळशी धरणाबरोबरच काळम्मावाडीच्या पर्यटनात भर पडेल आणि पुन्हा एकदा काळम्मावाडी गत वैभव प्राप्त होईल. यासाठी प्रशासनाने व लोकप्रतिनींधीनी प्रयत्न करावे, अशी मागणी नागरिक व पर्यटकांतून होत आहे. संबंधित विभागाने हा बगीचा खासगीकरण तत्त्वावर चालविण्यास दिल्यास राधानगरी तालुक्याच्या पर्यटनात भर पडेल. तसेच त्यामुळे बागेस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी बागेचे खासगीकरण करावे. अशी मागणी संदीप डवर यांनी केली आहे.