होमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस बनतोय ‘मिनी जंगल’

शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस बनतोय ‘मिनी जंगल’

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 07 2018 1:18AMकोल्हापूर : विजय पाटील 

हिरवीगार वनराई... पक्ष्यांचा सुरेल किलबिलाट... खिडकीतून थुई थुई नाचणार्‍या मोराचा स्वर्गीय नजारा आणि त्याच्या सोबतीला पिंजलेल्या कापसासारख्या सशांच्या जोड्या... अशा सदाबहार वातावरणात शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी लवकरच मिळण्याची शंभर टक्के खात्री आहे. कारण, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पुढील महिन्यानंतर पंचवीस हजारांहून अधिक वृक्ष असणार आहेत. 
शिवाजी विद्यापीठाचा परिसर 853 एकर इतका व्यापक आहे. विद्यापीठाचा परिसर अलीकडे हिरवागार बनला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोर, ससे, मुंगूस आदी प्राण्यांची संख्या वाढत आहे. या प्राण्यांचा अधिवास तयार होत आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहिमेमुळे विद्यापीठात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाते. आजमितीला विद्यापीठाच्या परिसरात चौदा हजार वृक्ष आहेत. लहान झाडाझुडपांची संख्याही मोठी आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये परिसरातील 10 एकर क्षेत्रावर वन विभागाच्या वतीने 11 हजार 111 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तर विद्यापीठाकडून 600 झाडे लावली जात आहेत. या झाडांमध्ये वड, पिंपळ, जांभूळ, देशी आंबा, चिंच, उंबर अशी देशी झाडे प्राधान्याने लावली जात आहेत. यासाठी खड्डे खोदाई करण्यात आली आहे. 
याचा सरळ अर्थ असा की, विद्यापीठाच्या परिसरात एकूण पंचवीस हजारांहून अधिक झाडे असणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे ही सगळी झाडे डेरेदार असणार आहेत. आगामी अडीच-तीन वर्षात बहुतांश कॅम्पस हिरवागार होईल, असे दिसते. इतक्या मोठ्या प्रमाणावर वनराई असल्याने पशू-पक्ष्यांची संख्याही वाढणार आहे. सध्या कॅम्पसमध्ये बाराशेच्यावर मोर आहेत. ससे, मुंगूस आहेत. आता या प्राण्यांची संख्या वाढेलच. याशिवाय इतर काही प्राण्यांचाही यामध्ये सहभाग वाढेल. त्यामुळे विद्यापीठाचे कॅम्पस कविवर्य रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन या झाडाखालच्या शाळेसारखे निसर्गसंपन्‍न दिसेल. वाहनांचा गोंगाट, धुराचे प्रदूषण आणि रोजच्या धावपळीच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक प्रांगण हे मिनी जंगलासारखे असणार आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन वर्षात हे ‘मिनी जंगल’ विद्यार्थ्यांना वर्गात लेक्‍चर सुरू असताना अनुभता येईलच. त्याशिवाय कँटिनमध्ये कटिंग चहा पिताना एखादा मोर नाचताना दिसेलच. पिटुकला ससाही समोरून गवतात पळताना पाहायला मिळेल.