Sat, Jul 20, 2019 09:19होमपेज › Kolhapur › मिनी आयटीआयमधून बनले दीड लाख कारागीर

मिनी आयटीआयमधून बनले दीड लाख कारागीर

Published On: Aug 05 2018 1:29AM | Last Updated: Aug 04 2018 11:40PMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

बौद्धिक क्षमता आहे. पण गुण कमी मिळाल्यामुळे कुठेच प्रवेश मिळत नसलेल्या युवकांसाठी ‘ट्रायसेम’ व ‘मिनी आयटीआय’ हा आधार होता. गेल्या 20 वर्षांत राज्यात सुमारे दीड लाखांवर युवकांनी प्रशिक्षण घेऊन ते स्वयंरोजगार करीत आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून 5 हजार युवकांना रोजगार मिळालेले आहेत. पण ही दोन्ही प्रशिक्षण केंद्रे बंद होणार असल्यामुळे या युवकांना आता भरमसाठ डोनेशन देऊ खासगी आयटीआयकडे जावे लागणार आहे. या केंद्रात राज्यात 153 कर्मचारी आहेत, त्यांच्यावरही बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. 

आजही समाजात लाखो कुटुंबे दारिद्य्र रेषेखाली वावरत आहेत. पालकांकडे पैसा नसल्यामुळे अनेक युवक कौशल्य विकासाचे शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा युवकांसाठी ट्रायसेम व मिनी आयटीआय ही प्रशिक्षण केंद्रे सुवर्ण संधी होती. ट्रासेममधून सायकल दुरुस्ती, वेल्डर, मोटारसायकल दुरुस्ती, गवंडी कामाचे प्रशिक्षण, रेडिओ दुरुस्ती असे प्रशिक्षण दिले जात होते. तर मिनी आयटीआयमधून मोटर दुरुस्ती, इलेक्टिशियन आणि मोटार रिवायडिंग याचे प्रशिक्षण दिले जाते होते. जिल्ह्यात ट्रायसेमचे केंद्र हे कोल्हापुरातील आयटीआयच्या परिसरात तर मिनी आयटीआय हा राधानगरी येथे सुरू होता. दोन केंद्रातून वर्षाला 220 युवकांना प्रशिक्षण दिले जात होते. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जात होते. पण आता ही केंद्रे बंद होणार असल्याने दारिद्य्र रेषेखालील युवकांनी कौशल्य विकास शिक्षणासाठी कोठे जायचे असा प्रश्‍न आहे. त्यामुळे त्यांची पिछेहाट होण्याची शक्यता आहे.

ट्रायसेम व मिनी आयटीआय सारखी केंद्रे बंद केल्याने कौशल्य विकासाचे सरकारचे धोरण तडीस जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हे प्रशिक्षण आता सरकारी व खासगी आयटीआयमधून मिळते. पण या ठिकाणी पुन्हा गुणांच्या टक्केवारीचा प्रश्‍न उपस्थित होणार आहे. ज्यांना टक्केवारी कमी असेल त्यांना खासगी आयटीआयकडे जावे लागणार आहे. या ठिकाणी त्यांचे शैक्षणिक शुल्क गोरगरिबांच्या मुलांना परवडणारे नाही, त्यासाठी सरकार काय निर्णय घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.   राज्य शासन या प्रशिक्षण केंद्रातील  कर्मचार्‍यांचे अन्य खात्यात समायोजन करेल, अशी अपेक्षा या केंद्रात काम करणार्‍या राज्यभरातील कर्मचार्‍यांना आहे.