Wed, Nov 21, 2018 13:19होमपेज › Kolhapur › कोल्हापूर :नातीच्या खूनप्रकरणी आजोबास जन्मठेप

कोल्हापूर :नातीच्या खूनप्रकरणी आजोबास जन्मठेप

Published On: Jan 05 2018 1:12AM | Last Updated: Jan 05 2018 12:32AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

दारात बसल्याच्या कारणावरून चिडून नातीचा विळ्याने वार करून खून केल्याप्रकरणी यशवंत धोंडी कांबळे (वय 62, रा. आरळे, ता. करवीर) याला अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 20 ऑक्टोबर 2016 रोजी मिनाक्षी कांबळे (वय 19) हिचा निघृण खून करण्यात आला होता.

आरोपी यशवंत कांबळे हा दारू पिऊन कुटुंबीयांना नेहमी शिवीगाळ करीत होता. 20 ऑक्टोबर 2016 रोजी मिनाक्षी कांबळे ही घराच्या दारात बसली होती. यावेळी यशवंत कांबळे त्याठिकाणी आला. ‘तू दारात का बसलीस‘ अशी विचारणा करत क्षुल्‍लक कारणावरून मिनाक्षीला मारहाण केली. तसेच रागाच्या भरात घरातील विळ्याने मिनाक्षीच्या गळ्यावर सपासप वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. काही वेळातच तिचे वडील मधुकर कांबळे घरात आले. रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या मिनाक्षीला त्यांनी उचलले असता तिने आजोबा यशवंत कांबळे याने वार केल्याचे सांगितले. तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत करवीर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विवेक शुक्‍ल यांनी काम पाहिले. मिनाक्षीने जखमी अवस्थेत दिलेली माहिती मृत्यूपूर्व जबाब मानावा, असा युक्‍तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यांनी केलेला युक्‍तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला. तपास सहायक पोलिस निरीक्षक पी. एस. मंडले यांनी केला.