Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Kolhapur › अनधिकृत गौणखनिज उत्खननास आता लाखोंचा दंड

अनधिकृत गौणखनिज उत्खननास आता लाखोंचा दंड

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:20AMसावर्डे बुद्रुक : वार्ताहर

कोणत्याही जमिनीतील दोन ब्रास गौण खनिज उत्खनन करत असताना त्या शेतकर्‍याला तहसीलदारांची परवानगी घेऊनच उत्खनन करावे लागणार आहे. तर यापेक्षा जास्त उत्खनन करावयाचे असेल तर रॉयल्टी भरावी लागणार आहे. तसेच बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन करत असताना सापडल्यास त्यांना वापरलेल्या यंत्राच्या किमती एवढा शास्ती (दंड) भरावा लागणार आहे. शासनाने काढलेल्या नव्या परिपत्रकानुसार हा नियम पूर्वीपेक्षा कडक करण्यात आला आहे 

एखाद्या व्यक्तीला आपले घर किंवा विहीर बांधण्यासाठी दगड, माती, मुरुम, वाळू यांची गरज भासते. अशा व्यक्तीने यापैकी दोन ब्रास उत्खनन करण्यासाठी तहसीलदारांकडे परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तर दोन ब्रास वरील उत्खननासाठी शासनाच्या नियमानुसार रॉयल्टी भरून परवानगीने करता येते. मात्र, विनापरवाना उत्खनन करण्याची निदर्शनास आले तर संबंधितांवर कडक कारवाईचे निर्देश आले आहेत. 

यामध्ये व्यक्ती दोषी आढळल्यास त्या व्यक्तीस एक हजार रुपये किंवा उत्खनन केलेल्याच्या पाचपट रक्कम आकारण्यात येणार असून यासह उत्खननात वापरलेल्या साहित्याच्या रकमेएवढी शास्तीची रक्कम असणार आहे. यात उत्खननासाठी वापरलेल्या ड्रिल  मशीनसाठी 25000 रु. ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, हाफ बॉडी ट्रक, संक्शन पंप साठी 1 लाख रुपये, फुल बॉडी ट्रक, डंपर ट्रेलर, कॉम्प्रेसर मशीनसाठी 2 लाख रुपये, ट्रालर, बार्ज, मोटराइज्ड बोटसाठी 5 लाख रूपये, एक्सकॅवेटर मेकॅनाइज्ड लोडरसाठी 75 हजार रुपयांपर्यंत शास्ती नव्या नियमानुसार असणार आहे.