Mon, May 20, 2019 08:27होमपेज › Kolhapur › कोट्यवधींची उलाढाल ठप्प

कोट्यवधींची उलाढाल ठप्प

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 25 2018 11:19PMइचलकरंजी : वार्ताहर

विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून वाहतूकदारांनी सुरू केलेल्या चक्‍काजाम आंदोलनाचा इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योगासह अन्य घटकांवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. सूत, तसेच कापडाची वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचबरोबर इतर घटकांचीही वाहतूक ठप्प असल्याने शहरात 300 कोटींहून अधिक रुपयांची होणारी उलाढाल ठप्प आहे. वाहतूकदारांच्या संपाला शहरातील तीनचाकी व चारचाकी मालवाहतूकदार टेम्पोचालक पाठिंबा दर्शवत आंदोलनात उतरले आहेत. आज शहरात ठिकठिकाणी तीनचाकी व चारचाकी, तसेच डंपर आदींची हवा सोडण्यात आली. अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकारही घडले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. संपाची तीव्रता वाढत चालल्याने शहरातील आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

देशभरात डिझेलचे समान दर, टोल दरात सवलत, बस आणि ट्रकला राष्ट्रीय परवाना यासह अन्य मागण्यांसाठी देशभरातील मालवाहतूकदारांनी चक्‍काजाम आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन आज सहाव्या दिवशीही सुरूच असून, या आंदोलनात इचलकरंजी शहरातील ट्रान्स्पोर्ट, मोटार आणि टेम्पोचालक-मालक सहभागी झाले आहेत. इचलकरंजी शहरात 90 हून अधिक ट्रान्स्पोर्ट असून, तीन हजारांहून अधिक ट्रक यांची आवक-जावक असते. यापैकी बहुतांशी ट्रक सूत आणि कापड, त्याचबरोबर अन्य साहित्याची वाहतूक करीत असतात. दररोज शहरात सुमारे 125 ते 200 ट्रकमधून कापड गाठी बाहेर पाठवल्या जातात. त्याचबरोबर सुताचीही शहरात मोठ्या प्रमाणात आवक होते. मात्र, चक्‍काजाम आंदोलनामुळे त्याचा शहरातील विविध घटकांवर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. यंत्रमाग उद्योग विविध घटकांवरही अवलंबून असल्याने, तसेच एकमेकांना पूरक उद्योग असल्यामुळे संपाच्या परिणामामुळे उलाढालीवर मोठा परिणाम जाणवत आहे. दररोज सुमारे 300 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल वस्त्रोद्योगात होते. गेल्या सहा दिवसांपासून कोट्यवधींची उलाढाल ठप्प आहे. त्याचबरोबर शहरात येणारी सुताची आवकही थांबल्याने शहरात सूतटंचाईचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.