Sun, May 26, 2019 13:11होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कोट्यवधींची फसवणूक; तिघे जेरबंद

कोल्हापूर : कोट्यवधींची फसवणूक; तिघे जेरबंद

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: May 01 2018 12:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गुंतवणुकीवर दरमहा बिटकॉईनच्या स्वरूपात पंधरा टक्के लाभांश देण्याच्या आमिषाने कोल्हापूर, सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील बड्या उद्योग व्यावसायिकांसह नोकरदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणार्‍या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला. ‘झिपकॉईन क्रिप्टो’ या कथित कंपनीच्या तीन भागीदारांना ‘एलसीबी’ने बेड्या ठोकल्या. 

संशयितांकडून 35 ते 40 कोटी रुपयांची फसवणूक झाली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. पथकाने कोंडाओळ येथील कार्यालयावर छापे टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
राजेंद्र भीमराव नेर्लेकर (वय 41), अनिल भीमराव नेर्लेकर (46, हुपरी, हातकणंगले), संजय तम्मान्ना कुंभार (42, शिरढोण, शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बालाजी राजेंद्र नेर्लेकर, 
पद्मा राजेंद्र नेर्लेकर (हुपरी, हातकणंगले), बालाजी गणगे (पुणे) या फरारी संशयितांचा शोध सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.

भामट्यांनी कोल्हापूर येथील बाळासाहेब लक्ष्मण झालटे (शिवम अपार्टमेंट, प्लॉट नं. 48) व त्यांच्या मित्रांना 29 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीला आले आहे. टोळीकडून फसवणूक झालेल्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. झालटे यांनी संशयितांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह कट रचणे, दी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स अ‍ॅक्ट कलम 1999चे कलम 3 प्रायव्हेट चीटफंड अधिनियम कलम 4 व 5, आय.टी. अ‍ॅक्ट कलम 66 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयितांना 2 मेपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश झाला आहे.

इंटरनॅशनल डिजिटल कंपनी असल्याचे भासवून संशयित नेर्लेकर बंधू व संजय कुंभार यांनी मुंबई, पुण्यासह कर्नाटकातील साथीदारांना हाताशी धरून येथील कोंडाओळ चौकातील एका व्यापारी संकुलात झिपकॉईन क्रिप्टो करन्सीचे नोव्हेंबर 2017 मध्ये कार्यालय थाटले.

ऑनलाईन कंपनीत गुंतवणुकीवर दरमहा बिटकॉईनच्या स्वरूपात पंधरा टक्के लाभांश  परतावा देण्याचेही संशयिताने आमिष दाखविले. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कर्नाटकातील अनेक बड्या उद्योग व्यावसायिकांसह व्यापार्‍यांनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केली. कंपनीमार्फत कमिशनवर एजंटाची साखळीही कार्यरत ठेवली होती. या साखळीमार्फत पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात फसवणुकीचा फंडा चालू होता.

कंपनीकडे मोठ्या रकमांची गुंतवणूक करूनही परतावा मिळत नसल्याचे निदर्शनास येताच झालटे व अन्य गुंतवणूकदारांनी कोंडाओळ येथील कार्यालय गाठले. संशयितांनी टाळाटाळ सुरू केल्याने गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक मोहिते यांच्याकडे धाव घेतली.

मध्यरात्री घरावर छापे : संशयित जेरबंद

पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते यांना कारवाईचे आदेश दिले. अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनकर मोहिते, उपनिरीक्षक सचिन पंडित, युवराज आठरे, राजेंद्र सानप, विजय कारंडे, यशवंत उपराटे आदींच्या पथकाने रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास छापे टाकून संशयितांना ताब्यात घेतले.

टोळीत मुंबई, पुण्यासह कर्नाटकातील सराईत सक्रिय

इंटरनॅशनल डिजिटल कंपनी असल्याचे भासवून सराईतांनी गेल्या चार, पाच महिन्यांत झिपकॉईन क्रिप्टो करन्सी कंपनीचा पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात विस्तार करून शेकडो गुंतवणूकदारांना लाखो रुपयांच्या गुंतवणुकीस भाग पाडण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई, पुण्यातील काही एजंटाची साखळी कार्यरत असावी, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे. टप्प्याटप्प्याने ही नावे चौकशीतून पुढे येतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही तपासाधिकारी दिनकर मोहिते यांनी सांगितले.

एक लाखाची गुंतवणूक केल्यास वर्षाला दीड लाखाचा परतावा?

कथित कंपनीकडे गुंतवणूक केल्यास त्यावर दरमहा बिटकॉईन स्वरूपात 15 टक्के लाभांश देण्याचे आमिष दाखविण्यात येत होते. झटपट पैसे कमावण्याच्या मोहाला बळी पडून अनेक बड्या व्यावसायिकांनी अवघ्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची शक्यता आहे. एक लाख रुपयाची गुंतवणूक केल्यास त्यावर वर्षाला दीड लाखाचा लाभांश हा व्यवहारच संशयास्पद असल्याचे दिनकर मोहिते यांनी सांगितले. फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

फरारी संशयित लवकरच जेरबंद

फसवणूकप्रकरणी अन्य फरार संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. मुंबई, पुणे व कर्नाटकातील काही संशयितांची नावे पुढे येत आहेत. त्यांचाही लवकरच छडा लावण्यात येईल, असेही तपासाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.